होमपेज › Nashik › नंदुरबारला कडकडीत बंद

नंदुरबारला कडकडीत बंद

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 11:38PMनंदुरबार : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्या वाहनावर मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटले असून, सोमवारी सर्व तालुक्यांसह गावोगावी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

खासदार डॉ. हीना गावित यांच्या वाहनाची रविवारी धुळ्यात मराठा आंदोलकांनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकाराबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोर्चाद्वारे निषेध व्यक्‍त केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चेकर्‍यांनी खासदार डॉक्टर हीना गावित यांच्या वाहनावर हल्ला करणार्‍या मराठा आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी  केली.

तसेच कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी  निवेदनाद्वारे करण्यात आली. मोर्चा काढण्यापूर्वी नंदुरबार शहरातील प्रमुख चौकांमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली. चौकाचौकात टायर जाळून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून संपूर्ण शहरातून बंदचे आवाहन केले. नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्‍कलकुवा या सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

दरम्यान, खांडबारा येथे काही संतप्त कार्यकर्त्यांकडून दगडफेकीचे किरकोळ प्रकार घडले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विविध संघटनांनी एकत्रित जाऊन निषेध नोंदवणारी निवेदने दिली. संपूर्ण जिल्ह्यात बंदचा प्रभाव दिसून आला. बाजारपेठा ओस पडल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान हल्ला करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली नाही तर सरकारला जाब विचारण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.