Tue, May 21, 2019 18:18होमपेज › Nashik › नाशिक परिसरात गारांचा पाऊस

नाशिक परिसरात गारांचा पाऊस

Published On: Apr 18 2018 12:52AM | Last Updated: Apr 18 2018 12:52AMनाशिक : प्रतिनिधी

शहर-परिसरात मंगळवारी (दि.16) दिवसभर ढगाळ वातावरणाने नाशिककर घामाघूम झाले असतानाचा दुसरीकडे आडगाव शिवारात सायंकाळी पाचच्या सुमारास गारांसह जोरदार सरी कोसळल्या. निफाड तालुक्यातील सायखेडा भागात विद्युत तार तुटल्याने शॉक लागून शेळी ठार झाली. मंगळवारी नाशिकमध्ये 38.5, तर  मालेगावमध्ये 40.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास आडगाव परिसरात काळे ढग दाटून आले. काही मिनिटांमध्येच गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास पावसाचा जोर कायम होता.

या पावसाने आडगाववासीयांची धावपळ उडाली. म्हसरूळमध्येही पाच ते दहा मिनिटे रिमझिम पाऊस झाला. आडगावमधील बेमोसमी पावसाने परिसरातील आंबा व द्राक्षासह इतर पिके धोक्यात आली आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या पार्‍याने चाळिशी गाठली होती. त्यानंतर पार्‍यात 36 अंशांपर्यंत घट झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पार्‍यात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे.मालेगावचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 40.8 अंशांवर स्थिरावला आहे. त्यामुळे मालेगाव शहरामध्ये दुपारी 12 ते 5 या काळात अघोषित संचारबंदीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह बेमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Tags : Nashik, Heavy, rain,  Nashik, area