Wed, Apr 24, 2019 21:49होमपेज › Nashik › नाशिकमध्ये कोसळधार

नाशिकमध्ये कोसळधार

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 1:35AMनाशिक : प्रतिनिधी

दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार असून, सोमवारी सकाळी आठपर्यंत सरासरी 34 मिलिमीटर तर दिवसभरात 18.04 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रमुख धरणसमूहात समाधानकारक साठा झाला असून, गंगापूर धरणातून 9,302 क्यूसेक तर दारणा धरणातून 10,600 क्यूसेक नांदूरमध्यमेश्‍वर बंधार्‍यातून 7,210 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. तसेच गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, संततधारेने शहरातील जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले आहे.

सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा करायला लावली. 7 जूनच्या रात्री पडलेला पाऊस दरम्यनाच्या काळात गायब झाला तो अखेरच्या आठवड्यात दोन दिवस पडला. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असताना गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधारेेने दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी सहानंतर पुन्हा संततधार सुरू झाली. रात्रभर ती कायम होती. सोमवारी सकाळी आठपर्यंत सरासरी 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर संततधार कायम होती. सायंकाळी पाचपर्यंत सर्वाधिक 61 मिलिमीटर पाऊस सुरगाणा तालुक्यात पडला. त्या खालोखाल पेठ तालुक्यात 59, तर इगतपुरी तालुक्यात 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच त्र्यंबकेश्‍वर-39, नाशिक-22.1, दिंडोरी-2, निफाड-4.5, सिन्नर-17, देवळा-1, कळवण-3, येवला-7 मिलिमीटर याप्रमाणे पाऊस झाला. दुसरीकडे नांदगाव, मालेगाव, बागलाण आणि चांदवड या तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा एक थेंबही कोसळला नाही. हंगामात आतापर्यंत एकूण सरासरी 406.51 मिलिमीटर म्हणजे 40.11 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना संततधारेने दिलासा दिला आहे. खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.

दुसरीकडे प्रमुख धरणसमूहातील साठाही समाधानकारक झाला आहे. गंगापूर धरण 78 टक्के भरले असून, सतर्कता म्हणून 9,302 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणही 79 टक्के भरले असून, 10,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्‍वर बंधार्‍यातून 7,210 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग तसेच वरच्या भागात पाऊस झाल्याने गोदावरी दुथडी वाहू लागली. हंगामातील पहिला पूर आला. 

नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर या प्रमुख भागांसह संपूर्ण शहरातच संततधार सुरू  होती. रविवारप्रमाणेच सोमवारीही सूर्यदर्शन होऊ शकले नाही. दिवसभरात 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, नोकरदारवर्गाला पाऊस अंगावर झेलावा लागला. अशोकस्तंभ परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याने बर्‍याचवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेऊन हा वृक्ष बाजूला केला. उशिरापर्यंत हे काम सुरू होते. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून सुरळीत करण्यात आली.  दुसरीकडे दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा खेळखंडोबा अनुभवायला मिळाला.