Tue, Apr 23, 2019 00:33होमपेज › Nashik › नंदुरबार : जिल्हयात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर

नंदुरबार : जिल्हयात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर

Published On: Aug 17 2018 12:48PM | Last Updated: Aug 17 2018 12:48PMनंदुरबार : प्रतिनिधी

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नवापुर तालुक्यातील सरपनी नदीला आणि आणि रंगावली नदीला पूर आला आहे. या पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले असून  रंगावली नदीच्या पुरात एक महिला वाहून गेली आहे. तर सरपणी नदीच्या पुरामुळे विसरवाडी येथील पूल कोसळून धुळे सुरत महामार्गावरची वाहतूक खंडित झाली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार कोसळत आहे. नवापुर तालुक्यातील चिंचपाडा तालुक्यात १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे ७० मीमी,  धडगाव तालुक्यातील मोलगी भागात ८० मीमी तर अन्यत्र देखील अशाच मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नवापूर तालुक्यात सर्वाधिक हानी झाली आहे. रंगावली नदीला आलेल्या महापुरामुळे काठालगतच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे अनेक घरातील साहित्य वाहून गेले आहे.

 जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचावकार्य सुरु केले आहे. रंगावली नदीच्या पुरात एक महिला वाहून गेल्याचे वृत्त आहे. अद्याप तिचा मृतदेह हाती लागलेला नाही. दरम्यान नवापुर शहरातही प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नवापुर तालुक्यातील विसरवाडी भागातून वाहणाऱ्या सरपणी नदीच्या पुरामुळे धुळे सुरत महामार्गावरील पूल तुटून त्याचा बराचसा भाग पुरात वाहून गेला.  धुळे-सुरत महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्यामुळे येथून होणारी वाहतूक खंडित झाली आहे. या मार्गावरील वाहतूक आता चरणमाळ घाट मार्गे वळवण्यात आली असून सर्वजनिक बांधकाम विभागाने तशा सूचना प्रसारित केल्या आहेत. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यरत झाले आहे. पंचनामा सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.