Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Nashik › एका रुग्णाला हृदय मिळता मिळता राहिले!

एका रुग्णाला हृदय मिळता मिळता राहिले!

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 25 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी

बे्रनडेड अरुण तांबोळी यांचे हृदय चेन्नईमधील रुग्णाला देण्याचा निर्णय झाला. चेन्नईमधील हॉस्पिटलने ऋषिकेश रुग्णालयातून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हृदय नेण्याची तयारी केली. मात्र, एचएएल प्रशासनाकडून एअर अ‍ॅम्ब्युलन्सला लॅन्डिंगचा क्‍लिअरन्स न मिळाल्याने एका कुटुंबांचे हृदय दानाचे स्वप्न तर चेन्नईतील गरजवंत रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांचे स्वप्न भंग पावले. 
तांबोळी कुटुंबीयांने अवयव दानाच्या निर्णयानंतर ऋषिकेश रुग्णालयाने महाराष्ट्राच्या झोनमध्ये कोणत्या रुग्णाला हृदयाची गरज आहे का याची चाचपणी केली. मात्र, तसा रुग्ण न आढळल्याने प्रशासनाने राष्ट्रीय ट्रान्सप्लाँन समितीशी संपर्क साधत हृदय दानाची सर्व माहिती दिली. राष्ट्रीय समितीने चेन्नईतील एका रुग्णामध्ये अरुण यांचे  हृदयाची गरज असल्याची माहिती दिली. ऋषिकेश हॉस्पिटलने चेन्नईमधील संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधला. तेथील हॉस्पिटलच्या टीमने  हृदय घेण्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने नेण्याची तयारी केली. मात्र, सकाळी 9 ते दुपारी दोनपर्यंत ओझर विमानतळावर या अ‍ॅम्ब्युलन्सला लॅन्डिंगसाठी एचएएलने क्‍लिअरन्स दिला नाही, अशी माहिती डॉ. संजय रकिबे यांनी दिली. 

वास्तविक पाहता ओझर विमानतळावरून रविवारी (दि. 25) एअर डेक्कनची मुंबई आणि पुण्यासाठीची नियमित सेवा कार्यान्वित आहे. या दरम्यान, एअर अ‍ॅम्ब्युलन्सला एक तासासाठी लॅन्डिंग व टेकऑफची क्‍लिअरन्स देण्यास एचएएल प्रशासनाचा कोणतीही अडचण नव्हती. मात्र, केवळ रविवार सुट्टीच्या दिवशी हा क्‍लिअरन्स नाकारण्यात आल्याचे समजते आहे. एचएएल प्रशासनाच्या या मनमानी भूमिकेमुळे एका रुग्णांचे प्राण पणाला लागले आहेत. 

सुरक्षिततेच्या कारणास्तव एचएएल प्रशासनाने यापूर्वी विमान लॅन्डिंग व टेकऑफला परवानगी नाकारणे हा पहिला अनुभव नाही. केवळ सुरक्षितेतच्या मुद्द्यामुळे ओझर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होण्यास तीन वर्षांचा कालावधी लोटला. अद्यापही मुंबई-पुणे वगळता इतर देशातील इतर मार्गावर सेवा चालू होऊ शकलेल्या नाही. दरम्यान, या सेवा भविष्यात सुरू होतील तेव्हा होतील; मात्र, एक तासासाठी क्‍लिअरन्स न देणार्‍या एचएएल प्रशसानाच्या गलथान कारभारामुळे एका व्यक्तीच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे.