Thu, Apr 18, 2019 16:21होमपेज › Nashik ›

संदर्भ सेवा रुग्णालयासाठी साडेतीन कोटींची ‘आरोग्य सेवा’
 

संदर्भ सेवा रुग्णालयासाठी साडेतीन कोटींची ‘आरोग्य सेवा’
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 2:08AMनाशिक : प्रतिनिधी

शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील असुविधांबाबतच्या तक्रारी वाढण्यासोबतच रुग्ण व त्यांच्या नातलगांना होत असलेल्या मनस्तापानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे आयुक्‍त व संचालक संजीव कुमार यांनी थेट संदर्भ रुग्णालयातच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रुग्णालयाच्या औषधोपचारासाठी तीन कोटी व लिफ्ट दुरुस्तीसाठी 65 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. 

संदर्भ रुग्णालयातील लिफ्ट नादुरुस्त असून, वातानुकुलून यंत्रणादेखील बंद पडल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयातील आवश्यक यंत्रसामग्रीदेखील दुरुस्तीअभावी बंद पडल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. याबाबत आ. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्‍त संजीव कुमार यांनी संदर्भ सेवा रुग्णालयास बुधवारी (दि.4) भेट देत पाहणी केली. त्यावेळी संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आयुक्‍तांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर तसेच आ. फरांदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत रुग्णालयाच्या औषधांसाठी तीन कोटी व लिफ्ट दुरुस्तीसाठी 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, दुरुस्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम व विद्युत विभागासंबंधित असलेल्या तक्रारी आणि दुरुस्तीविषयी आठ दिवसांत अंदाज पत्रके सादर करण्याचे आदेश संजीव कुमार यांनी दिले आहेत. रुग्णालयाकडे असलेले 19 कोटी रुपये खर्च करण्याच्या निर्णयासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती संजीव कुमार यांनी दिली. या बैठकीत उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, संदर्भचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. गुठे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

Tags : Nashik, Health Service,  three and a half crores, sandarbh seva hospital