Mon, Apr 22, 2019 15:55होमपेज › Nashik › त्याने केला मालकाचाच विश्वसघात!

त्याने केला मालकाचाच विश्वसघात!

Published On: Aug 31 2018 5:04PM | Last Updated: Aug 31 2018 5:04PMपंचवटी वार्ताहर : देवानंद बैरागी 

 नाशिक परिसरात वेगवेगळ्या नावाने कामाला राहून मालकाचा विश्वास संपादन करून ऑफिस मधील चेक चोरी करत त्यावर बनावट सही करून लाखो रुपये बँकेतून परस्पर काढणाऱ्या तसेच मालकांच्या गाड्या विकणाऱ्या लखोबाला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे . विशेष म्हणजे या संशयित आरोपीने स्वतःच्या घरात देखील चोरी केली असून या चोरीच्या पैशातून राजस्थान येथे अकरा एकर जमीन खरेदी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . 

शेवटचा चेक वटवून राजस्थानात कायमस्वरूपी स्थायिक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या संशयिताला आता जेलची हवा खावी लागणार आहे . आत्तापर्यत विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर घरफोडी,वाहनचोरी आणि फसवणुकीच्या ११ गुन्ह्यांची नोंद आहे . रतेश उर्फ रितेश विश्राम कर्डक,दिगंबर उपासनी,हरीश हेगडे,चंद्रकांत कापडणीस,महेश आनंद जोशी,धीरज मदनराव मतसागर,दिगंबर पुजारी वय ३२ रा फ्लॅट न १३ श्रीवास्तू शिल्प बंगला,शिवतेजनगर,पेठरोड पंचवटी,मूळ भोरवड,ता सिन्नर हल्ली रा स्नेहधन होस्टेल सिंतागुंफा पंचवटी असे अटक केलेल्या लखोबाचे नाव आहे . या संशयित आरोपी वेगवेगळे नाव धारण करून प्रत्येक ठिकाणी थोडेच दिवस काम करीत असे . 

या दरम्यान आपल्या मालकाचा विश्वास संपादन करून ऑफिस मध्ये सही केलेले आणि कोरे चेक कुठे ठेवलेले याची पाहणी करून मालक नसताना त्याची चोरी करून बँकेतून पैसे काढून घेत होता . तसेच २०१० साली आपल्या घरातून २५ लाख रुपये चोरी केले होते . त्यावेळी वडिलांनी पंचवटी पोलिसात गुन्हा नोंदविला असता त्यामध्ये रतेश यानेच पैसे चोरल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली होती . तसेच याच पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे देखील गुन्हे दाखल आहे . त्यानंतर १०१३ साली गंगापूर रोड येथील अनिल पाठक यांच्याकडे रतेश कर्डक या मूळ नावाने ड्रायव्हर म्हणून ८ दिवस काम केल्यावर पाठक यांची सॅन्ट्रो कार ओझर येथील शिववाहन बाजारात १ लाख ५ हजार रुपयांना विकून टाकली होती . 

आलेल्या पैशातून राजस्थान येथे भवानीपुरा कोटा येथे जागेच्या खरेदीसाठी इसार रक्कम म्हणून दिली आणि त्यानंतर ११ एकर जमीन २७ लाख रुपयांना खरेदी केली होती . २०१४ साली दिलीप वाघ (बुधा हलवाई) यांच्याकडे हरीश दिगंबर पुजारी नावाने ड्रायव्हर म्हणून १५ दिवस काम करीत तवेरा गाडी घेऊन फरार झाला होता . मात्र,पोलिसाची चाहूल लागताच गाडी पाथर्डी फाटा येथे बेवारस सोडून हा संशयित फरार झाला होता . २०१४ साली विक्रम कपाडिया यांच्याकडे दिगंबर पुजारी या नावाने दोन महिने काम करून त्यांची होंडा सिटी कार अहमदनगर येथे २ लाख ५० हजार रुपयांना विकली होती .

 २०२७ साली अंबड येथील हेडा नावाच्या मालकीच्या श्रीराम मार्केटिंग कंपनीमध्ये रवींद्र नावाने ऑफिस बॉयचे काम सुरु करून आठवडा भरात चार ते पाच कोरे चेक चोरून ७६ हजार रुपये विविध बँकेतून काढून घेतले . उरलेल्या दोन चेकवर १ लाख ४० हजार रुपये स्वाक्षरी चुकल्यामुळे परत आले होते . २०१८ साली सोम कन्स्ट्रक्शन येथे धीरज मतसागर या नावाने कामाला असताना तीन दिवस काम करून ३ चेक चोरले होते . त्यावर दीड लाख रुपये रक्कम टाकली होती . मात्र,सही चुकल्याने त वटले नव्हते . 

त्यानंतर पुष्कराज ट्रेडर्स मध्ये चार दिवस काम करून एक चेक चोरून ४० हजार रुपये बँकेतून काढले होते . तसेच ए जी ग्रुप शंकरनगर येथे आठवडा भर काम करून ३ ते ४ कोरे चेक चोरी करून ४५ हजार रुपये बँकेतून काढले होते . बन्सीलाल डेरे आर्किटेक्ट कडे चार दिवस काम करून ३ चेक चोरी करून ४ हजार रुपये काढले होते . तर बाकी चेकवर ४ लाख रुपये भरले होते मात्र,पेमेंट बंद केल्याने वटु शकले नव्हते . 

व्यंकटेश डेव्हलपर्स कडे दोन दिवस काम करून सहा चेक चोरून त्याद्वारे ६० हजार रुपये काढून मौजमजा केली होती . तसेच स्नेहसदन येथे राहत असताना शेजारी राहणाऱ्या मुलाचा लॅपटॉप वापरण्यासाठी घेऊन तो ७ हजार रुपयांमध्ये विकून टाकला होता . तर मित्रांच्या ओळखीच्या दुकानातून लॅपटॉप विक्री करण्यासाठी दोन लॅपटॉप घेऊन ते मुंबई येथे विकून टाकले होते . 

अशा पद्धतीने विश्वास संपादन करून लाखो रुपयांना चुना लावणाऱ्या लखोबाला पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले आहे . संशयित आरोपी रतेश उर्फ रितेश विश्राम कर्डक याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात २ ,भद्रकालीत ५,गंगापूर २,अंबड १ आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात १ अशा ११ विविध गुन्ह्यांची नोंद आहे . हा संशयित एक शेवटचा चेक वटवून कायमस्वरूपी राजस्थान येथे घेतलेल्या जागेवर राहण्यासाठी जाणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल करीत आहे .