Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Nashik › हतगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

हतगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 11:38PMकनाशी : वार्ताहर

कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद केला आहे. कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र, हतगड किल्ला बंद असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्‍त होत असून, संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हतगड किल्ल्यावर आता शुकशुकाट दिसत आहे.

नाशिक-सापुतारा रस्त्यावर सापुतार्‍यापासून फक्‍त पाच किमी अंतरावर असलेला हतगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी हतगड गाव असून, किल्ला अतिशय विलोभनीय आहे. किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तू उभ्या आहेत. किल्ल्यावरील वातावरण अत्यंत आल्हाददायक असून, पावसाळ्यात तर हिरवेगार गालीचे अंथरलेले वाटतात. किल्ल्यावर सेल्फी काढण्याच्या नादात दुर्घटना घडली होती.

गुजरात राज्यात पावसाळ्यात शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. सापुतारा येथील विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेतल्यावर पर्यटक हतगड किल्ला बघण्यासाठी येतात. परंतु, किल्ला बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन परत निघून जातात. कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून हतगड किल्ल्याचे संवर्धन व किल्ल्याचा परिसर विकसित करण्यासाठी लाखोचा खर्च करण्यात आलेला आहे. वनविभागाकडून पर्यटनस्थळी प्रवेश शुल्क निश्‍चित केले आहे.

या रकमेतून पर्यटनस्थळांची देखरेख करण्यात येते. मात्र, आता नेमकी पर्यटकांच्या माध्यमातून पैसे मिळविण्याची वेळ आली असताना वनविभागाने किल्ल्यावर प्रवेश केल्याने देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्‍न वन व्यवस्थापन समितीला पडला आहे. शिवाय पर्यटकांची एकदा पाठ वळली तर ते पुन्हा किल्ल्याकडे फिरकणार नाही. किल्ल्यावरील प्रवेश बंदी उठवावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.