Tue, Mar 26, 2019 22:12होमपेज › Nashik › बेपत्ता अभियंत्याचे आठवडाभर देवदर्शन

बेपत्ता अभियंत्याचे आठवडाभर देवदर्शन

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी

कामाच्या तणावामुळे चिठ्ठी लिहून तब्बल एक आठवड्यापासून बेपत्ता झालेले महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना पोलिसांनी पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक येथून शुक्रवारी (दि.1) पहाटे ताब्यात घेतले. गेल्या आठ दिवसांपासून पाटील हे तणावमुक्‍तीसाठी देवदर्शन करीत होते, असे चौकशीत समोर येत आहे. पाटील यांनी अक्कलकोट, कोल्हापूर, गाणगापूरसह ठिकठिकाणी देवदर्शन केल्याचे समजते. दरम्यान, पाटील हे घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पाटील बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. महापालिका प्रशासनापासून ते पोलिसांपर्यंत सर्वांना त्यांनी कामाला लावले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पाटील आत्महत्या तर करणार नाही ना या भीतीमुळे कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला होता. पाटील यांनी मोबाइल सोबत नेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या लोकेशनचा शोध घेणे पोलिसांसाठी अवघड बनले होते. बुधवारी (दि.30) पाटील यांचे ई-मेल अकाउंट ओपन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी पाटील यांचे लोकेशन शोधले. ते पुण्यातील शनिवारवाडा परिसरात असल्याचे समजले.

पोलिसांनी पाटील यांच्या परिवाराशी संपर्क साधल्यावर त्यांना पुण्यात पाटील यांचे नातेवाइक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांचे पथक गुरुवारी (दि.31) तत्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या नातेवाइकांकडे तपास केला असता, पाटील हे त्यांच्या नातलगासमवेत देवदर्शनासाठी फिरत असल्याचे समजले. पाटील हे शुक्रवारी (दि.1) पहाटे स्वारगेट बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच स्वारगेट बसस्थानकावर साध्या वेशात पाळत ठेवली. पाटील हे बसमधून उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नाशिकला आणले. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात त्यांचा जाबजबाब नोंदविण्यात आला.