नाशिक : प्रतिनिधी
शहरातील 163 लॉन्स व मंगल कार्यालयांवर सोमवारपासून (दि.21) मनपामार्फत कारवाई केली जाणार आहे. गंगापूर रोडवरील सावरकरनगरमधील गोदावरी नदीकाठच्या काही बड्या असामींच्या लॉन्सपासून या कारवाईला मुहूर्त लागणार आहे. सहा महिन्यांपासून संबंधित मालमत्ताधारकांना बांधकामे नियमित करण्यासंदर्भात सूचना आणि त्यानंतर अंतिम नोटिसा देण्यात आल्या होत्या.
शहरातील मेरी, म्हसरूळ, दिंडोरी रोड, औरंगाबाद रोड, नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-मुंबई महामार्ग तसेच सातपूर व पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. यातील बहुतांश मंगल कार्यालये ही शेतीवर उभारण्यात आली आहेत. त्यासाठी कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नाही, लॉन्ससाठी लागणारी पार्किंग व अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. इतके सारे असूनही मनपा प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु, तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर लगेचच कारवाईचे पाऊल उचलले आहे. महापौर रंजना भानसी यांनीदेखील पेठ रोड व दिंडोरी रोडवरील काही मंगल कार्यालयांमधील गैरवापर समोर आणला होता.
तेव्हापासून ही कार्यवाहीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली होती. मुंढे यांच्यामुळे त्यास आणखी गती मिळाली. यामुळे नगररचना विभागाने शहरातील 163 मंगल कार्यालयांना गेल्या महिन्यात अंतिम नोटिसा बजावून त्यासंदर्भातील अहवाल अतिक्रमण विभागाकडे सादर केला आहे. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भातील धोरणानुसार पाच ते सहा प्रस्ताव मनपाला प्राप्त झाले आहेत. उर्वरित 163 मंगल कार्यालयांना नोटिसा बजावून त्यासंदर्भातील कारवाईची फाइल रवाना करण्यात आली असून, त्यास आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सोमवारी (दि.21) सावरकरनगर येथून ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.