Sun, Aug 25, 2019 00:25होमपेज › Nashik › जिल्ह्यात गारठा वाढला; शेतकरी चिंतातूर

जिल्ह्यात गारठा वाढला; शेतकरी चिंतातूर

Published On: Feb 12 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 1:35AMनाशिक : प्रतिनिधी

हवामान बदलाचा परिणाम जिल्ह्यावर झाला असून, रविवारी (दि. 11) दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात 12.3 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले. वातावरणातील गारठा वाढला असून, या हवामानाचा फटका द्राक्ष, कांदा, मक्यासह इतर पिकांना होण्याची चिन्हे असल्याने     शेतकर्‍यांपुढील चिंतेचे ढग गडद झाले आहे. अरबी समुद्रात मुंबई ते मालदीवपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. धुळे, जळगावसह मराठवाड्याला रविवारी गारपिटीने झोडपले आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलाचा परिणाम जिल्ह्यावरही स्पष्ट दिसून येत आहे. नाशिक शहरात सकाळपर्यंत तर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवू लागल्याने नाशिककर गारठले आहेत. ढगाळ वातावरणाने काढणीला आलेल्या द्राक्षांना फटका बसू शकतो. द्राक्ष घडामधून मणी गळून पडण्याची शक्यता असल्याने उत्पादकांनी धसका घेतला आहे.

दुसरीकडे शेतात सुकायला ठेवलेल्या कांद्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. दरम्यान, मका, गहू, टोमॅटो तसेच इतर भाजीपाला खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढगाळ असेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.