होमपेज › Nashik › वेतन करारासाठी एचएएल कामगारांचा संप

वेतन करारासाठी एचएएल कामगारांचा संप

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 11:09PMओझर : वार्ताहर

भारतीय वायू सेनेचा कणा म्हणून ओळख असलेल्या येथील एचएएल कामगारांच्या पाच वर्षांच्या वेतन करारासाठी पुकारलेल्या संपाला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. सकाळी कामगार आणि पोलीस यांच्यातील किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता हा संप शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा एचएएलच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आला होता. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या माजी संचालिका वैशाली अनिल कदम यांनी संपकर्‍यांची भेट घेऊन संपाला पाठिंबा दिला.

ऑल इंडिया एचएएल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीकडून शुक्रवारी (दि.24) पुकारलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला. विशेष बाब म्हणजे सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांनीदेखील संपात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतातील संपूर्ण एचएएल कामगार डिव्हिजन एकदिवशीय संपावर गेला होता. त्यामध्ये कंपनीकडून कामगारांना पुरवण्यात येणार्‍या अत्यावश्यक सुविधांमध्ये हॉस्पिटल सुविधा, अग्‍निशमन दल, एअर ट्रॅफिक कंट्रोल, सिक्युरिटी सुविधा मात्र सुरू होत्या. कामगारांनी सकाळी साडेपाच वाजता एकत्र येत कारखान्याचे सर्वच मुख्य प्रवेशद्वारे बंद करून जोरदार घोषणाबाजी केली. वेतन करार पाच वर्षांचा झालाच पाहिजे, हमारी मांगे पुरी करो, हम सब एक है तसेच कामगार प्रबोधन गीते गात गेटवर ठिय्या धरला. वेतनकराच्या मुद्यावर एचएएल कामगार संघटनेतर्फे 17 ऑगस्ट रोजी मुख्य प्रवेशद्वारावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.

संरक्षण क्षेत्रातील अग्रणी असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा वेतन करार कालावधी संपला असून, नवीन वेतन कराराची बोलणी व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये चालू आहे. परंतु, बंगलोर येथे झालेल्या उच्च व्यवस्थापनाबरोबर एकूण सहा वेळा झालेल्या चर्चेत व्यवस्थापन 10 वर्षे, तर कामगार संघटना पाच वर्षे कालावधीच्या मुद्यावर ठाम आहेत. पाच वर्षे वेतनकराराच्या मागणीसाठी एच.ए.एल. कामगार संघटनेने संपाचा मार्ग धरला. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि एच.ए.एल समन्वय समितीचे प्रवक्ते भानुदास शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे, उपाध्यक्ष जितू जाधव, पवन आहेर, योगेश ठुबे, प्रकाश गभाले, सहचिटणीस दीपक कदम, आनंद गांगुर्डे, गिरीश वलवे, मिलिंद निकम, खजिनदार अमोल जोशी, कार्यकारी सदस्य सुरेश पाटील, भूषण ब्यास, मनोहर खालकर, स्वप्नील तिजोरे, कैलास सातभाई, नितीन पाटील, मन्सुर शेख, सागर कदम, रमेश कदम, प्रतीक गोळेसर, सुनील जुमळे, चेतन घुले, संतोष आहेर, सचिन धोंडगे, नवनाथ मुसळे, योगेश अहिरे, अनिल गवळी, रोशन कदम, श्रीकांत घुले आदी उपस्थित होते.