होमपेज › Nashik › एचएएल व नाशिकचे ‘राफेल’मुळे नुकसान

एचएएल व नाशिकचे ‘राफेल’मुळे नुकसान

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 11:50PMनाशिक : प्रतिनिधी

‘राफेल’ विमानांच्या देखभालीचे काम ओझर येथील ‘एचएएल’कडे दिले जाणार होते. मात्र, त्याऐवजी या क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेल्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीकडे ते सोपविण्यात आले असून, त्यामुळे एचएएल व नाशिकचे प्रचंड नुकसान झाल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राफेल घोटाळ्याची व्याप्‍ती तब्बल 36 हजार कोटी रुपयांपर्यंत असून, आगामी निवडणुकीतील हाच प्रमुख मुद्दा राहणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.

ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे रविवारी (दि. 12) झालेल्या या कार्यक्रमात आमदार हेमंत टकले यांनी चव्हाण यांची मुलाखत घेतली. चव्हाण यांनी मनमोकळेपणाने प्रश्‍नांना उत्तरे देत आपला जीवनपटच नाशिककरांपुढे उलगडून दाखवला. चव्हाण यांचे बालपण, शिक्षण, राजकारणात प्रवेश, पंतप्रधान कार्यालयातील काम, राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा अनुभव अशा अनेक पैलूंवर या मुलाखतीतून प्रकाश टाकण्यात आला. चव्हाण यांनी सध्या गाजत असलेल्या राफेल विमान खरेदीच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, केंद्रात संपुआचे सरकार असतानाच राफेल विमान खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

तेव्हा 580 कोटी रुपये प्रतिविमान अशी किंमतही निश्‍चित करण्यात आली होती. फ्रान्सकडून 126 विमाने खरेदी केली जाणार होती. मात्र, 2014 मध्ये केंद्रात सरकार बदलले व नव्या सरकारने तब्बल 1 हजार 680 कोटी रुपये प्रतिविमान अशी किंमत मोजत 36 विमानांची खरेदी केली. त्यातून प्रतिविमान 1 हजार कोटी रुपयांप्रमाणे देशाचे 36 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, हा बोफोर्सच्या शंभर पट मोठा घोटाळा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याविषयी अवाक्षरही उच्चारत नाहीत. हा एकप्रकारचा राष्ट्रद्रोहच आहे. या विमानांच्या देखभालीचे काम एचएचएलला दिले जाणार होते. केंद्र सरकार, फ्रान्स सरकार व एचएएल असा करारही केला जाणार होता. मिग विमानांच्या निर्मितीचे काम थांबल्याने एचएएलकडे सध्या पुरेसे काम उपलब्ध नाही. या पार्श्‍वभूमीवर राफेल विमानांचे काम एचएएल व नाशिकसाठी फायदेशीर ठरणार होते. मात्र, शेवटच्या क्षणी हा निर्णय बदलून साध्या मोटारसायकल उत्पादनाचाही अनुभव नसलेल्या व हजारो कोटींची कर्जे बुडविलेल्या अंबानींच्या कंपनीला हे काम दिल्याने नाशिकचे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. 

दरम्यान, चव्हाण यांनी आई-वडिलांच्या राजकीय कारकीर्दीसह आपल्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांचा यावेळी आढावा घेतला. शिक्षणासाठी परदेशात असताना, आपल्याला राजकारणात जाण्याची फारशी इच्छा नव्हती. मात्र, सन 1972 मध्ये भारतात परतल्यानंतर संगणक क्षेत्रात काम सुरू केले. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लक्षात ठेवले. सन 1991 मध्ये आई निवडणूक लढविण्यास तयार नसल्याने राजीव गांधी यांनी रात्री तीन वाजता दूरध्वनी करून आपल्याला लोकसभेचे तिकीट दिले. कराड मतदारसंघातून लाखभर मतांनी निवडून आलो व राजकीय इनिंग सुरू झाली. मात्र कुटुंबातील तिसर्‍या व्यक्‍तीला खासदारकी मिळत असल्याचे पाहून तेव्हा काँग्रेसमधून बराच त्रास सहन करावा लागल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यावर 2002 मध्ये गुजरात निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिले.

कोणत्याही राज्याचे प्रभारीपद सांभाळणे हे अत्यंत कठीण व अभ्यासाचे काम असते. त्या निवडणुकीत गुजरातमधील काँग्रेसच्या खासदारांची संख्या 7 वरून 12 पर्यंत पोहोचली. पुढे 9 राज्यांच्या निवडणुकांत प्रभारी म्हणून कामकाज सांभाळले. त्यामुळे देश समजून घेता आला. 2004 मध्ये संपुआ सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर टाकण्यात आली. पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातील दुवा म्हणून काम पाहत असताना, अनेकदा शिव्या खाण्याची वेळही आली. पण राज्यांतील मतभेद मिटविणे, राष्ट्रीय पातळीवरील अनेक वादांवर तोडगा काढणे या अनुभवातून देश कसा चालतो, याचे धडे मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. 

प्रारंभी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, मंदार भारदे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, वसंत खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.