होमपेज › Nashik › पालकमंत्री महाजन यांनी घेतली भुजबळांची भेट

पालकमंत्री महाजन यांनी घेतली भुजबळांची भेट

Published On: Jun 04 2018 1:06AM | Last Updated: Jun 03 2018 10:45PMनाशिक : प्रतिनिधी

राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि.3) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचा तपशील समजू शकला नसला तरी महाजन यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे समजते. मात्र, या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

राजकारणात सदा सर्वकाळ कोणी कुणाचा शत्रू आणि मित्रही नसतो, असे बोलले जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. भुजबळ हे जामिनावर बाहेर असून, पक्ष भेद दूर सारुन विविध पक्षीय नेते त्यांची भेट घेत आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांनी रुग्णालयात व निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रविवारी दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपा नेते गिरीश महाजन यांनी भुजबळांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये नेमके काय गुफ्तगू झाले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. खरे तर मुख्यमंत्री फडणवीस हे जाहीर सभेत तुरुंगात असलेल्या भुजबळांच्या शेजारील कोठडीत राष्ट्रवादीतील भ्रष्टाचारी नेत्यांची वर्णी लावू, असा धमकीवजा इशाराच देत होते. मात्र, भुजबळ आता तुरुंगातून बाहेर असून, भाजपा नेत्याने त्यांची भेट घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तब्बल 15 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस महाजन यांनी केल्याचे समजते. तसेच, राज्यातील सद्यस्थितीतील राजकारणारवरही दोन्ही नेते बोलल्याचे कळते. एकूणच, या दोन्ही हेवीवेट नेत्यांची भेट नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता.