Tue, Feb 19, 2019 20:26होमपेज › Nashik › नाशिकमध्ये पालघरची पुनरावृत्ती होईल : महाजन

नाशिकमध्ये पालघरची पुनरावृत्ती होईल : महाजन

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:30PMनाशिकरोड : वार्ताहर

पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळविला. या निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघात पाहायला मिळेल, त्याचप्रमाणे नाशिकच्या विजयाने भाजपाचा विधान परिषदेत बहुमताचा आकडा वाढेल, असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

नाशिक शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिकेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचारसभेचे आयोजन नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयात करण्यात आले होते. व्यासपीठावर गृहराज्यमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, महापौर रंजना भानसी, मनपा स्थायी सभापती हिमगौरी आहेर, उदय वाघ, बबन चौधरी, भानुदास बेरड, दिनकर पाटील, संभाजी मोरुस्कर, बाजीराव भागवत, शांताराम घंटे, शरद आहेर आदींसह पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

ना. महाजन म्हणाले, पालघर निवडणूक म्हणजे भाजपाचे नवीन व्हर्जन आहे. या व्हर्जनचा पुरेपूर वापर शिक्षक निवडणुकीत करून घ्यावा. भाजपाने चार वर्षांत जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्याचा उपयोग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत होईल. भाजपाला निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची आहे. कार्यकर्त्यांचे मोठे संघटन भाजपाकडे असून, त्यांच्या जोरावर भाजपा विजयश्री खेचून आणेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हटले की, नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात भाजपाची शक्ती आणि संघटन असून, सत्तेत असताना महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भाजपाचे उमेदवार अनिकेत पाटील यांनी भाजपा शासनावर शिक्षकांचा विश्‍वास आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात भाजपाला यश मिळेल. प्रचार सभेनंतर भाजपाचे मंत्री आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनिकेत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल आयुक्त राजाराम माने यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.