Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Nashik › ग्रामपंचायतींमध्ये आठ कोटींचा अपहार

ग्रामपंचायतींमध्ये आठ कोटींचा अपहार

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 12:55AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आठ कोटी रुपयांचा अपहार झाला असून, या प्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी दिली. तसेच वर्षानुवर्षे लेखापरीक्षण न झालेल्या ग्रामपंचायतींची तपासणीही लवकरच हाती घेणार असल्याचेही ते म्हणाले.

ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या असहकार आंदोलनाची धार दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मीना यांची बदली ही प्रमुख मागणी लावून धरण्यात आली आहे. मीना यांनी या आंदोलनाची फारशी दखल घेतलीच नाही. उलट ग्रामसेवकांना दणका देण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कारभाराकडेच मोर्चा वळविला आहे. ग्रामसेवक आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात 1382 ग्रामपंचायती असून, यापैकी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आठ कोटी रुपयांचा अपहार झाल्याची माहिती खुद्द मीना यांनीच दिली. विशेष म्हणजे, या अपहाराप्रकरणी गटविकास अधिकार्‍यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे कानाडोळाच केला असल्याचेही सांगण्यात आले.

अपहार प्रकरणी दोषी असणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गटविकास अधिकार्‍यांनी खोडा घातल्यास त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा मीना यांनी दिला आहे. काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत औद्योगिक वसाहती असून, संबंधित ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. पण, या महसुलाचा कोणत्याही प्रकारचा हिशेब जुळत नाही. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे अशा ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षणच झालेेले नाही. त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायतींची तपासणीही हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

विभागीय आयुक्तांवर पलटवार

गेल्या आठवड्यात विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हा परिषदेत येऊन घेतलेल्या आढावा बैठकीत असमाधानकारक कामकाजावर ताशेरे ओढले होते. अखर्चित निधी असो वा योजना राबविण्याच्या बाबतीत जिल्हा परिषद तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे झगडे यांनी नमूद केले होते. मीना यांनी मात्र हे सारेच मुद्दे खोडून काढले आहे. जलयुक्त शिवार योजनेची 2060 कामे झाली आहेत. अपंगांचा निधीही खर्च होत आहे. पाच लाख वृक्षलागवडही झाली आहे. शौचालय बांधणीचे कामही वेगाने सुरू असल्याचे सांगत मीना यांनी जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा छातीठोकपणे केला आहे. एकाच वेळी ग्रामसेवक  तसेच आयक्तांनाही अंगावर घेण्याचे धाडस त्यांनी दाखविल्याने रोषही पत्करावा लागणार आहे.