Wed, Jul 24, 2019 12:41होमपेज › Nashik › ४५ हजार कर्मचारी संपावर

४५ हजार कर्मचारी संपावर

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 07 2018 1:00AMनाशिक : प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी मंगळवारपासून (दि.7) तीन दिवस संपावर जाणार आहेत. या संपात जिल्ह्यातील सुमारे 45 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याने महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींचे काम थंडावणार आहे. दरम्यान, शासकीय कर्मचार्‍यांच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतेवेळी राज्य कर्मचारी मध्यवर्ती, नाशिक जिल्हा तलाठी, वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच कोतवाल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. परंतु, सरकार केवळ घोषणा करत असून, प्रत्यक्षात हाती काहीच मिळत नसल्याची भावना कर्मचार्‍यांमध्ये आहे. सरकारची वेतन आयोगाबाबतची चालढकल बघता मुंबईत सोमवारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय सभेत दि. 7, 8 आणि 9 ऑगस्ट असे तीन दिवस संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

राज्य स्तरावरील या संपात जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतींमधील कर्मचार्‍यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस जिल्ह्यातील कारभार ठप्प होेणार आहे.

मागण्यांबाबत सरकार केवळ आश्‍वासने देत असून, प्रत्यक्षात मात्र कृती शून्य आहे. बक्षी समितीने अद्यापही त्यांचा अहवाल दिलेला नाही. यापूर्वी गणेशोत्सवकाळात सातवा वेतन आयोग लागू करणार होेते. आता मुख्यमंत्र्यांनी 1 जानेवारीपासून तो लागू करण्याची घोषणा केली आहे. मागील 32 महिन्यांचा फरक दिलेला नाही. आताही 14 महिन्यांचा फरक देण्यात आलेला नाही. मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याने संप करावा, अशी कर्मचार्‍यांचीच इच्छा आहे.  - दिलीप थेटे, जिल्हाध्यक्ष, राज्य कर्मचारी महसूल संघटना 

होमगार्ड्सची घेणार मदत

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघात संपात सहभागी होण्याबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ चे अधिकारी कामावर उपस्थित राहणार आहेत. कार्यालयातील दालन तसेच इतर सुविधांसाठी होमगार्ड्सची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विभागीय महसूल कार्यालयात आठ तर जिल्हाधिकारी कार्यालयात 12 होमगार्ड्सची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्य सरकारी कर्मचारी संपात महासंघ सहभागी नाही 

नाशिक : राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तसेच संघटनेच्या पदाधिकारी मंडळासोबत चर्चा करून थकीत महागाई भत्ता व सातवा वेतन आयोग देण्याचे मान्य करून अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संपात महासंघ सहभागी नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष मुक्‍तेश्‍वर मुनशेट्टीवार, अण्णा पगारे, रंजना बारसे यांनी दिली. आजची राज्याची आंदोलनाची स्थिती लक्षात घेता सरकारी कर्मचार्‍यांनी शासनाला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलन न करण्याची ही वेळ आहे. इतकी प्रतीक्षा केली आणखी वाट पहावी म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ संपात सहभागी होणार नाही, असे त्यांनी कळविले आहे.