Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Nashik › सातवा वेतन आयोगासाठी शासकीय कर्मचारी संपावर

सातवा वेतन आयोगासाठी शासकीय कर्मचारी संपावर

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 12:05AMमालेगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून विनाविलंब सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी शासकीय-निमशासकीय कर्मचारी,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. राज्य शासकीय कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 18 विविध संघटनांनी मंगळवारी दुपारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर केले.

प्रथम तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी, राज्य कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय 60 करावे, केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, सर्व संवर्गातील पदे तत्काळ भरावीत, अनुकंपा तत्त्वावरील अर्ज प्राधान्याने निकाली काढावीत, महिला कर्मचार्‍यांना बालसंगोपन रजा मंजूर करावी, शासकीय कार्यालयातील कंत्राटीकरण व खासगीकरण धोरण रद्द करावे, चौकशीनंतरच अधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हावी, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संपाची हाक दिली आहे. त्यात महसूल, पंचायत समिती व शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यांनी संयुक्‍तपणे तहसील ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून लक्ष्मण राऊत यांना निवेदन दिले.

या संपात राज्य सहकार खाते गट कर्मचारी संघटना, शिक्षक लोकशाही आघाडी, आदिवासी विकास आश्रमशाळा संघटना, मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, तलाठी आदी संघटनांचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी संपात सहभाग घेत मसगा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.