लासलगाव : वार्ताहर
मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग चौथ्या दिवशीदेखील सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेरगावी पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने दोन ते अडीच कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज एक हजारांहून अधिक वाहने लिलावासाठी येत असतात. दररोज लासलगाव बाजार समितीमध्ये 17 ते 20 हजार क्विंटल कांद्याची आवक होत असते. मात्र, व्यापार्यांनी खरेदी केलेला माल पाठवण्याची व्यवस्थाही ठप्प असल्याने बाजार समितीतून खरेदी केलेला शेतमाल हा बाहेर पाठवणे शक्य नसल्याने संपूर्ण बाजार समितीत शुकशुकाट दिसत होता. जिल्हा आणि ग्रामीण स्तरातून सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास संप कायम राखण्यात येईल, अशी भूमिका ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या (एआयएमटीसी) वतीने घेण्यात आली आहे. डिझेलचा समावेश जीएसटीअंतर्गत करून त्यावरील किमतीवर नियंत्रण हवे, देशभरातील डिझेल किमतीमध्ये समानता हवी, टोल यंत्रणेत पारदर्शकता हवी या मागण्यांसाठी वाहतूकदारांनी संप पुकारला आहे.
संपात परिसरातील 100 हून अधिक मालवाहतूकदारांचा सहभाग असल्याने तीन दिवसांत करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मालवाहतूकदारांचा संप लवकर मिटला नाही तर येणार्या काही दिवसांत कांद्याचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी, कांद्याचे बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. व्यापारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आजपासून लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बाजार समितीतील शेतमालाचे व्यवहार सुरळीत होणार आहे. शेतकरी वर्गाने आपला शेतमाल टप्प्या-टप्प्याने विक्रीस आणावा जेणेकरून शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे जयदत्त होळकर म्हणाले. मालवाहतूकदारांच्या संपामुळे कांदा लिलाव ठप्प झाले. त्यामुळे शेतकर्यांची गैरसोय झाली आहे. शेतकर्यांची गैरसोय दूर करण्यासाठी 25 जुलैपासून व्यापारी वर्गाने कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी याबाबत घोषणा करण्यात आल्याचे मनोज जैन यांनी सांगितले.