Sat, Apr 20, 2019 23:51होमपेज › Nashik › बैल धुण्यास गेलेला मुलगा पाटात वाहून गेला

बैल धुण्यास गेलेला मुलगा पाटात वाहून गेला

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 10:54PMआडगाव रेपाळ :

बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांनी पोळा सण साजरा केला नाही. आडगाव रेपाळ  येथे तनपुरे वस्तीलगत पालखेड कालवा वाहतो. कालव्याला आवर्तन सुरू आहे. त्यामुळे कालवा काठोकाठ भरलेला आहे. पोळा असल्याने दुपारी बारा वाजता गोकुळ अण्णासाहेब तनपुरे (16) हा बैल धुण्यासाठी गेला होता.

पाटाच्या कडेला बैल धूत असताना अचानक एका बैलाने गोकुळला पाटाच्या पाण्यात ओढले. पोहता येत नसल्याने गोकुळ पाण्यात वाहून गेला. गोकुळ सोबत लहान मुले असल्याने त्यांनी दुर्घटनेची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर गोकुळला पाटाच्या पाण्यात शोधण्याचे कार्य सुरू झाले. मात्र, साडेतीन तास उलटूनही गोकुळचा तपास  लागला नाही. पाटात पाण्याची पातळी अधिक असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. ग्रामस्थांनी मदत करीत  शोधकार्य सुरू केलेले होते. मात्र, गोकुळचा शोध लागलेला नव्हता.