Sat, Apr 20, 2019 16:26होमपेज › Nashik › तारुखेडलेत विहिरीत पडलेला बिबट्या बाहेर

तारुखेडलेत विहिरीत पडलेला बिबट्या बाहेर

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:36AMसायखेडा : वार्ताहर

निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात बिबट्याची दहशत कायम असून, काही दिवसांपूर्वी औरंगपूर येथे एक-दीडवर्षीय मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर शनिवारी (दि.17) पहाटे पाच वाजेच्या सुमारास तारुखेडले येथील संजय रामचंद्र शिंदे यांच्या शेती क्षेत्रात (गट नं. 16) असलेल्या भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेला पाच-सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे.

काही वर्षांपासून निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात बिबट्याचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहे. काही दिवसांपूर्वी महाजनपूर (ता. निफाड) येथे घोडा फस्त केला. त्यापाठोपाठ मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार केल्या होत्या. तर तळवाडे शिवारात ऊस क्षेत्रावरील पाणी बदलायचे ठिकाणी दोन बिबटे शेतकर्‍यांना दिसले. सुदैवाने मोटरसायकल सुरू असल्याने बालंबाल बचावले. इतर ग्रामस्थांनाही बिबट्याचे दर्शन झाले. 10-15 दिवसांपूर्वी तामसवाडी येथे ऊस क्षेत्रात तीन बछडे आढळून आले होते. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने बिबट्याचे लपणे कमी होत आहे. दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेती कामे खोळंबली असून, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहे.

तारुखेडले येथे सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडलेल्या बिबट्याने जोराच्या आवाजाने परिसर दणाणून सोडला होता. याविषयी शेतकरी शिंदे यांनी वनविभागाला कळविल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल प्रसाद पाटील, ए. पी. काळे, जितेंद्र राठोड, वनरक्षक भरत पाटील, व्ही. आर. टेकनर, भय्या शेख, दत्तू आहेर, रामचंद्र गंढे, मधुकर शिंदे, नारायण वैध, तानाजी सांगळे, भारत माळी, पिंटू निहारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. सकाळी 7 वाजेच्या सुमारास निफाड येथील रोपवाटिकेत नेले. या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चांदोरे यांनी तपासणी केली.

चाटोरीत वासरू ठार

चाटोरी (ता. निफाड) येथे शनिवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात येथील शेतकरी शिवाजी पंढरीनाथ कदम यांच्या मालकीचे वासरू ठार झाले आहे.

कदम यांची मळ्याच्या भागात वस्ती असून, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. शेती क्षेत्रातील (गट नं. 83) घराजवळच बांधलेले वासरू बिबट्याने हल्ला करीत फस्त केले. या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रसाद पाटील, जितेंद्र राठोड, अशोक काळे, वनसेवक व्ही. आर. टेकनर, भैया शेख आदींनी भेट देत पंचनामा केला.

विंचूर दळवी येथे वासरू व दोन शेळ्या फस्त

सिन्‍नर : सिन्‍नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे शुक्रवारी (16) रात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू व दोन शेळ्या फस्त केल्या. चंद्रेमळा येथील निवृत्ती खंडू चंद्रे यांच्या मालकीचा गट नं. 131 या जागेवर जनावरांचा गोठा आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला. गोठ्यात जर्सी गायीचे वासरू व दोन हॉस्टन जातीच्या शेळ्यांवर हल्ला केला. चंद्रे यांना गोठ्याच्या बाजूने आवाज आल्याने त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील शेतकर्‍यांना बोलविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बिबट्या वासरू व दोन शेळ्या फस्त करून पसार झाला होता. चंद्रे यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.