होमपेज › Nashik › अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतमालाला भाव द्या!

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतमालाला भाव द्या!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जळगाव : प्रतिनिधी

शेती आणि अर्थव्यवस्था सुधारायाची असेल तर शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. जोपर्यंत शेतमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत कितीही सांगितले तरी ते फायद्याचे नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.तर्फे दिला जाणारा कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्काराचे वितरण शुक्रवारी जैन हिल्स येथे झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षा खडसे, माजी मंत्री सुरेश जैन, आ. संजय सावकारे, आ. डॉ. सतीश पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. राजू भोळे, आ. किशोर पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. हरिभाऊ जावळे, आ. चंदुलाल पटेल, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलुभाऊ जैन, कविवर्य ना. धो. महानोर, माजी खा. गुणवंतराव सरोदे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, महापौर ललित कोल्हे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील आदी उपस्थित होते. 

खा. पवार म्हणाले, कापसावर बोंडअळी येते ती पीक उद्ध्वस्त करते. अशी अनेक संकटे शेतकर्‍यांसमोर येत असतात. हरियाणा, पंजाबमध्ये गव्हाच्या पिकावर तांबेरा रोग पाहावयास मिळाला, तसाच रोग केळीवरही येण्याची शक्यता असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे व्यक्‍तिमत्त्व फणसासारखे होते, अशी सांगितले. 

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारंभास उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगत शेतीमध्ये प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान होत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तसेच जैन इरिगेशनने शेतकर्‍यांचे जीवनामान सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी क्षेत्रामध्ये जैन इरिगेशनने मोलाचे कार्य केले असून, आप्पासाहेब पवार पुरस्कार त्यांच्यामार्फत दिला जातो ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले, शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी बनविलेली ही शेतकर्‍यांची कंपनी आहे. शेतकर्‍यांंची पतप्रतिष्ठा कशी वाढेल यासाठी भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांना आप्पासाहेब पवार यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या नावानेच हा पुरस्कार देण्याचा निर्णय भवरलालजी जैन यांनी घेतला होता. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आभार मानले. मान्यवरांचे स्वागत अनिल जैन, अतुल जैन यांच्यासह परिवारातील सदस्यांनी केले. ज्योती आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.

नाशिक जिल्ह्याला मान

 जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.तर्फे कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व खा. शरद पवार यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता. चांदवड) येथील प्रगतिशील शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे  यांना प्रदान करण्यात आला. सुती हार, श्रीफळ, सन्मानचिन्ह दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ज्योती जैन यांच्या हस्ते रश्मी पाटोळे यांना साडी, फळ, खणा-नारळाची ओटी देऊन सत्कार करण्यात आला.

Tags : Nashik, Nashik News, price, farmer, improve, economy!


  •