होमपेज › Nashik › मनमाडला तुटलेल्या रुळावरून गीतांजली एक्स्प्रेस धावली

तुटलेल्या रुळावरून गीतांजली एक्स्प्रेस धावली

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:59AM

बुकमार्क करा
मनमाड :  प्रतिनिधी

जलदगतीने धावणारी अन् मनमाड येथे थांबा नसलेली गीतांजली एक्स्प्रेस तुटलेल्या रुळावरून धावली. परंतु, मोठा अनर्थ टळल्याने शेकडो प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला. याबाबत रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.9) मनमाड रेल्वेस्थानकातील तीन क्रमांकाच्या फलाटावर खाद्यपदार्थ विक्री करणारे अल्ताफ मणियार, विशाल पगारे व नितीन सपकाळे काम करत होते. तर  ‘प्रवाशांनी फलाट क्रमांक दोनच्या कडेला उभे राहू नये, येेथे न थांबणारी गीतांजली एक्स्प्रेस जलदगतीने जाणार आहे’, अशी उद्घोषणा रेल्वे उद्घोषकांकडून करण्यात आली होती. यानंतर काही वेळातच मुंबई येथून हावडाकडे जाणारी गीतांजली एक्स्प्रेस सुसाट वेगाने मनमाड स्थानकातून जात असताना मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून तीनही खाद्यपदार्थ विक्रेत्यांना  काही तरी झाल्याचा संशय आला.

गाडी गेल्यानंतर त्यांनी रुळाकडे पहिले असता, रुळाला मोठा तडा गेल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ स्टेशनमास्तर संजय गलांडे यांच्याकडे जाऊन घटनेची माहिती दिली. गलांडे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. रुळाला मोठा तडा गेल्याचे दिसताच त्यांनी टेक्निकल विभागाशी संपर्क साधल्यानंतर डी. एम. पाटील, पी. डब्ल्यू. सोनवणे हे इतर कर्मचार्‍यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तर मुख्य तिकीट प्रवेक्षक कांबळे, रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक रजनीश यादव, आर. के. मीना यांनीही घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेच्या टेक्निकल कर्मचार्‍यांनी तडा गेलेल्या रुळाची तत्काळ दुरुस्ती केली.