नाशिक : प्रतिनिधी
घरकुल आवास योजनेसाठी अपात्र ठरलेल्या झोपडपट्टीतील कुटुंबांचे सशुल्क पुनर्वसन करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला असून, या निर्णयाचा शहरातील 43 हजार 301 कुटुंबांना लाभ होणार आहे. शासन निर्णयानुसार संबंधित कुटुंबांना परवडणार्या घरांचा लाभ दिला जाणार असला तरी त्यासाठीचे शुल्क मात्र, अदा करावे लागणार आहे. यामुळे या योजनेला कितपत प्रतिसाद मिळतो याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
1 जानेवारी 2001 पर्यंतच्या झोपडपट्टी आणि त्यातील पात्र रहिवाशांसाठी घरकुल आवास योजना शासनाने लागू केली होती. त्यानुसार मनपाने शासन अनुदानाच्या मदतीने शहरात चुंचाळे, शिवाजीवाडी, पंचवटी यासह विविध ठिकाणी 11 हजारांहून अधिक घरकुल तयार करून त्याठिकाणी पात्र लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली. शहरात आजमितीस 159 झोपडपट्ट्या आहेत. त्यात 41 हजार 707 इतक्या झोपड्या असून, त्यात एकूण 55 हजार 520 कुटुंबे वास्तव्य करत आहेत. त्यापैकी 12 हजार 219 कुटुंब हे 2001 पूर्वीची असल्याचे मनपाच्या सर्वेक्षणात आढळून आल्याने संबंधित कुटुंबांची घरकुलसाठी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर 43 हजार 301 कुटुंबांकडेे 2001 पूर्वीच्या वास्तव्याचा पुरावाच आढळून आला नाही. यामुळे मनपाने त्यांना अपात्र ठरविले आहे. यामुळे अशा कुटुंबांसाठी शासनाने सशुल्क पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी परवडणारी घरे अशा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये एक लाख 94 हजार 368 इतकी लोकसंख्या आहेत.