Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Nashik › जिल्ह्यात गॅस्ट्रोने तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात गॅस्ट्रोने तिघांचा मृत्यू

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:42AMबोरगाव : वार्ताहर

गॅस्ट्रोच्या साथीने कहर केला असून, सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे गॅस्ट्रोने आतापर्यंत चौघांचा बळी गेला आहे. बुधवारी (दि.11) दिवसभरात तिघांचा गॅस्ट्रोने बळी गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. तर, मंगळवारी कळवण तालुक्यातील वीरशेत येथे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

राहुडे येथे गॅस्ट्रोने सोमवारी (दि.9) नामदेव मोतीराम गांगुर्डे (55) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी (दि.11) सीताराम जिवा पिठे (72), बशिर्‍या पांडू लिलके (70) आणि नवसू वाळू पवार (70) या तिघा रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

सुरगाणा, पेठ, कळवण या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले आहे. हातपंपाचे दूषित पाणी पिल्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची लागण झाली असून, रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. प्राथमिक उपचार केंद्रावर निदान होत नसल्याने शेकडो रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळवण तालुक्यातील वीरशेत येथे  दोन दिवसांपूर्वीच मंगला जाधव (30) या महिलेचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना बुधवारी राहुडे येथील तीन रुग्णांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अधिकार्‍यांसह 20 डॉक्टर व आरोग्य सेविका या ठिकाणी अहोरात्र तळ ठोकून आहेत. राहुडे गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी लीना ढाके यांनी दिली. तसेच, कालच्या घटनेनंतर गावामध्ये ग्रामपंचायतीने तातडीने बोअरवेल खोदण्याचे काम चालू केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

गॅस्ट्रोने थैमान घातल्यानंतर उशीराने का होईना जिल्हाप्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन.बी यांनी बुधवारी (दि.11) तातडीने साथ पसरलेल्या गावांना भेट दिली. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. घटना कशी घडली, त्यांची कारणे, किती रूग्ण बाधित आहेत, किती रूग्णांचा मृत्यु झाला, किती वैद्यकिय पथके तैनात आहेत, पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे का, साथीचे आजार पसरु नये, यासाठी काय दक्षता घेतली आहे याबाबत विचारणा केली आहे.