Thu, Jul 18, 2019 08:05होमपेज › Nashik › गांजाविक्री रॅकेटमध्ये शिवसेनेची माजी पदाधिकारी

गांजाविक्री रॅकेटमध्ये शिवसेनेची माजी पदाधिकारी

Published On: Jun 20 2018 1:14AM | Last Updated: Jun 19 2018 11:21PMनाशिक : प्रतिनिधी

गांजाविक्री प्रकरणात शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकार्‍याचा सहभाग उघडकीस आला आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने ही महिला फरार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास करून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथून दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे गांजा प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची संख्या आतापर्यंत सहा झाली आहे.

सुरेश रामसिंग चव्हाण-बेलदार आणि सुखदेव शहादेव पवार (दोघे रा. पारोळा, जि. जळगाव) अशी एरंडोल येथून अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्याचप्रमाणे ओडिसा येथून अटक केलेल्या अकबर खान (26) यास न्यायालयाने 26 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही दिवसांपूर्वी गांजा वाहतूक करणार्‍या दोघांना आडगावमधील तपोवन परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून 680 किलो गांजा जप्‍त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सिन्नरमधून 390 किलो गांजासह एकास अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून हे ओडिसातून अकबर शेख नामक संशयितांकडून मोठ्या प्रमाणात गांजा विकत घेत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अकबरलाही ओडिसातून अटक केली.     

त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून जळगाव जिल्ह्यातील गांजाविक्री करणार्‍या चव्हाण आणि पवार या दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान, गांजाविक्रीच्या अवैध धंद्यात पंचवटीतील शिवसेना महिला आघाडीची माजी पदाधिकारीही सहभागी असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच ही महिला फरार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे गांजा विक्रीच्या धंद्यातील राजकीय पदाधिकार्‍यांचा सहभाग उघडकीस आला आहे.