होमपेज › Nashik › गंगापूर, दारणाचा विसर्ग वाढविला

गंगापूर, दारणाचा विसर्ग वाढविला

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 21 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, गंगापूर-दारणासह प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी (दि. 21) दिवसभरात 42 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने विसर्गात 4 हजार 342 क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दारणा व नांदुरमध्यमेश्‍वरमधूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात दिवसभरात 142.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील 48 तास जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ंयात पावसाने मुक्काम ठोकला आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, शुक्रवारी (दि. 20) मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरवात केली. नाशिक शहरात दिवसभर अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर गंगापूर आणि काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधारेत वाढ झाली. दरम्यान, त्र्यंबकेश्‍वरमध्येही पाउस कायम आहे. या पावसामुळे गंगापूर धरणाच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. धरणात सद्यस्थितीत 4422 दलघफु म्हणजेच 79 टक्के साठा आहे. दरम्यान, सकाळी 11 वाजता धरणाच्या विसर्ग दीड हजारांहून 3456 क्युसेसपर्यंत वाढविण्यात आला. सायंकाळपर्यंत त्यात 4342 क्युसेकपर्यत नेण्यात आला.

इगतपुरीतही पावसाची संततधार सुरूच आहे. भावली धरण 100 टक्के भरले आहे. तर तालूक्यातील सर्वात महत्वाचे धरण असलेले दारणातील साठा 5 हजार 875 दलघफूवर पोहचला आहे. त्यामुळेच धरणातील विसर्ग 1100 वरून 4934 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. गंगापूर व दारणेतील आवक वाढल्याने नांदुरमध्यमेश्‍वरचा विसर्गात वाढ करण्यात आली. धरणातून सायंकाळी सहा वाजता 11 हजार 200 क्युसेक वेगाने पाणी मराठवाड्याकडे झेपावत आहे. पालखेडमधून 646, चणकापूरमधून 1642, पुनदमधून 1985 तर ठेंगोड्यातून 3900 क्युसेक विसर्ग केला जात आहे. 

जिल्ह्यातील नऊ तालूक्यात शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत 142.2 इतका पाउस नोंदविण्यात आला. यात सर्वाधिक 51 मिमी पाऊस सुरगाण्यात झाला. नाशिकमध्ये 4, इगतपुरीत 28, त्र्यंबकेश्‍वरमध्ये 26, पेठमध्ये 27.2, निफाड व दिंडोरीत प्रत्येकी 1.6, सिन्नरमध्ये 2 तर कळवणमध्ये 1 मिमी पाऊस झाला. उर्वरित तालूक्यात मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, पुढील 2 दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.