होमपेज › Nashik › गंगापूरच्या विसर्गात वाढ; सतर्कतेचा इशारा

नऊ धरणांमधून विसर्ग

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:10AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात रविवारी (दि. 22) पावसाचा जोर काहीसा घटला असला तरी रिमझिम सरींमुळे धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यस्थितीत नऊ धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणाच्या विसर्गात 5931 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दारणातून 3656 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. दरम्यान, पुढील 48 तास जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

धरणांचे पाणलोट क्षेत्र वगळता इतरत्र जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर ओसरला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर 25 तर कश्यपीच्या क्षेत्रात 29 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. अंबोलीत 27 मिमी पाऊस झाला. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणाचा विसर्ग 4342 वरून 5931 क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. धरणातून होणार्‍या विसर्गामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाण्याची पातळी पोहचली आहे. परिणामी गोदाघाटावरील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. 

इगतपुरी तालुक्यात दिवसभरात 15 मिमी पावसाची नोंद झाली. दारणेतील आवक मंदावल्याने विसर्गात काहीशी घट करण्यात आली. धरणातून सायंकाळी 6 वाजता 3,656 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. नांदूरमध्यमेश्‍वरमधून 18,672 क्यूसेक वेगाने पाणी मराठवाड्याकडे झेपावत आहे. पालखेडमधून 646, भावलीतून 481, कडवातून 1552, चणकापूरमधून 2068, पुनदमधून 2426 तसेच ठेंगोड्यातून 4518 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

जिल्ह्यातील 24 प्रमुख धरणांमधील एकूण साठा 32 हजार 429 दलघफूवर म्हणजेच 49 टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र, मालेगाव, नांदगाव, सिन्नरचा पूर्व पट्टा, चांदवड, निफाड तसेच येवला या भागांना आजही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

भावली, वैतरणा धरण ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण रविवारी (दि. 22) ओव्हरफ्लो झाले. दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातीलच भावली धरण 100 टक्के भरले. सद्यस्थितीत भावलीतून 481 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे तर वैतरणा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. हे धरण ओव्हरफ्लो झाल्याने मुंबई व त्याच्या उपनगरांची चिंता मिटली आहे. 

धरणसाठा (दलघफूमध्ये)

गंगापूर : 4422, दारणा : 5876, काश्यपी : 1372, गौतमी गोदावरी : 1117, आळंदी : 921, पालखेड : 339, करंजवण : 3206, वाघाड : 1407, ओझरखेड : 574, पुणेगाव : 366, तिसगाव : 14, भावली : 1434, मुकणे : 2667, वालदेवी : 883, कडवा : 1498, भोजापूर : 96, चणकापूर : 1168, हरणबारी : 687, केळझर : 207, गिरणा : 3521, पुनद : 5583.