Fri, Aug 23, 2019 21:34होमपेज › Nashik › मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा

मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:41PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

फेसबुकवर संपर्क केल्यानंतर तुमच्या मुलाचे बालाजी फिल्ममधील मालिकेत निवड झाल्याचे सांगत पालकांकडून हजारो रुपये उकळणार्‍या दिल्लीस्थित कुटुंबाचा शहर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी दिल्लीतील महिलेस अटक केली असून, तिची मुलगी आणि पती फरार आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजू ओबेराय सेठ (55, रा. न्यू दिल्ली) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. रोहन आणि विदुषी सेठ असे इतर दोघा संशयितांची नावे आहेत.

संशयित विदुषी सेठ हिने फेसबुकवर 2 ते 25 वयोगटातील मुलामुलींसाठी चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी असल्याचे सांगत कोणी इच्छुक असल्यास इनबॉक्स मध्ये संवाद साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गंगापूर रोडवरील रहिवासी तेजल चांदवडकर यांनी 13 नोव्हेंबरला संपर्क साधला. त्यावेळी विदुषीने मोबाइल क्रमांक देत तेजल यांच्यासोबत संवाद साधत आमची रेडक्‍लिफ प्रॉडक्शन नावाची कंपनी असल्याचे सांगत आई अंजू या कंपनीच्या संस्थापक आहेत असे सांगितले. आम्ही काही दिवसांनी सोमेश्‍वर धबधबा येथे फोटोशूट काढण्यासाठी येत आहोत. तुम्हाला तुमच्या मुलाचे फोटोशूट करायचे असल्यास तेथे या असे सांगितले. तसेच, कंपनीत नावनोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपये शुल्क भरण्यासही विदुषीने सांगितले. सोमेश्‍वर येथे गेल्यानंतर चांदवडकर कुटूंबीयांना वेगवेगळी प्रलोभने दाखवत सेठ कुटूंबीयांनी पेटीएम द्वारे हजारो रुपये उकळवले. त्यानंतर विदुषीने काही दिवसांनी तेजल यांच्यासोबत संपर्क साधून तुमच्या मुलाची बालाजी टेलिफिल्मच्या ममता 2 या मालिकेत निवड आणि बिग बाजारच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याचे सांगत साडेचार हजार रुपये घेतले.

काही दिवसांनी करारनामा पाठवत 28 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान, बंगरुळू येथे मालिकेच्या शूटिंगसाठी मुलासोबत एकास बोलावले. मात्र, त्याआधी 11 हजार 733 रुपये भरण्यास सांगितले. तेजल यांचे पती आणि मुलाला बंगरुळू येथे गेले असता तेथे कोणत्याही प्रकारची शूटिंग नसल्याचे समजले. त्यानंतर चांदडवकर कुटुंबीयांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधून सेठ कुटुंबीयांविरोधात तक्रार केली. पोलिसांनी गडकरी चौकातील एका हॉटेलमधून संशयित अंजू सेठ हिला अटक केली तर रोहन आणि विदुषी सेठ दोघेही दिल्लीत लपल्याने त्यांच्या शोधासाठी सोमवारी (दि.15) एक पथक पाठवण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. राजू भुजबळ यांनी दिली. दरम्यान, अंजू सेठ हिला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.15) पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच शहरातील काही पालकांनी त्यांना सेठ कुटुंबीयांनी याचप्रकारे गंडवल्याच्या तक्रारी केल्या आहेत. सोमवारी या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. फसवणूक झाल्यास नागरिकांनी तक्रारी कराव्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.