Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Nashik › गंगापूर धरण 65 टक्के भरले

गंगापूर धरण 65 टक्के भरले

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 15 2018 11:31PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोेट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 65 टक्के भरले असून, दारणाचा साठाही 61 टक्के झाला आहे. त्यामुळेच नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख 24 प्रकल्पांमधील पाणीसाठा 18 हजार 732 दलघफू म्हणजे 28 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

गत चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (दि. 14) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. त्र्यंबकेश्‍वर आणि अंबोली परिसरात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणात सद्यस्थितीत 3667 दलघफू एवढा साठा आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी धरणात 2621 दलघफू म्हणजेच 47 टक्के पाणी होते हे विशेष. दुसरीकडे महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख प्राप्त झालेल्या इगतपुरी तालुक्यालाही वरुणराजाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे तालुक्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या दारणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणात आजमितीस 4396 दलघफू (61 टक्के) पाणी आहे. 

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पावसाने जोर धरला आहे. धरणांच्या क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळेच पालखेड, ओझरखेड, गिरणा धरण समूहासह व पुनद प्रकल्पातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होेत आहे. गेल्या गुरुवारी (दि. 12) जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये अवघे 13 हजार 251 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, सततच्या पावसाने तीन दिवसांमध्येच या साठ्यात 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. आजमितीस हा आकडा 18 हजार 732 दलघफूवर पोहोचला आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर जिल्ह्यात कायम राहणार आहे. त्यामुळेच धरणांच्या पातळीतही झपाट्याने वाढ होईल. परिणामी जिल्ह्यावासीयांची पुढील चिंता दूर सरणार आहे.