Tue, Jul 07, 2020 23:23होमपेज › Nashik › गंगापूर, दारणातून विसर्ग

गंगापूर, दारणातून विसर्ग

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 11:25PMनाशिक : प्रतिनिधी

वरुणराजाने जिल्ह्यावर कृपावृष्टी केली असून, धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर 78 टक्के भरल्याने सोमवारी (दि. 16) सकाळी 10 वाजेपासून धरणातून 1500 क्यूसेसने गोदावरीच्या पात्रात विसर्ग करण्यात आला. रात्री 8 वाजता हा विसर्ग 9302 क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे गोदेला यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर आला. दुसरीकडे दारणातूनही विसर्ग केला जात आहे.  जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने सर्वदूर मुक्‍काम ठोकला आहे. गत 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणांमधील आवक सुरूच आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील संततधारेमुळे तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरण 75 टक्के भरले आहे. धरणातील साठा 4201 दलघफूवर पोहचला आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून सकाळी 10 वाजता प्रथम दीड हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दुपारी दोन वाजता यामध्ये 5688 तर 4 वाजत हाच विसर्ग 5 हजार 688 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. परिणामी गोदावरीला यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पूर आला आहे. 

इगतपुरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले असून, दारणा धरणातील पाण्याची आवक मोेठ्या प्रमाणावर होत आहे. धरणातील पाण्याची पातळी 5 हजार 641 दलघफूवर (79 टक्के) पोहचल्याने त्यातून विसर्ग सुरू केला जात आहे. दारणातून नदीत 6 हजार 602 क्यूसेक वेगाने दारणेच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. सायंकाळी 6 वाजता हा विसर्ग 10 हजार 600 क्यूसेकपर्यत वाढला.  दरम्यान, गोदावरी व दारणेतून पाणी सोडण्यात येत असल्याने निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्‍वर बंधार्‍यात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळेच दिवसभर 7 हजार 210 क्यूसेक वेगाने बंधार्‍यातून पाणी मराठवाड्याकडे सोडण्यात आले आहे. रात्री 9 वाजेनंतर हा वेग 23 हजारांपर्यत वाढल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, चणकापूरमधून 567, पुनदमधून 1198 तर ठेंगोडा धरणातून 871 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास त्यानुसार रात्रीतून धरणांमधून विसर्ग वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल तरी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.