Thu, Jan 24, 2019 05:39होमपेज › Nashik › रामकुंडावर रंगला गंगापूजन सोहळा

रामकुंडावर रंगला गंगापूजन सोहळा

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 11:45PMपंचवटी :  वार्ताहर

श्री स्वामी समर्थ...जय जय स्वामी समर्थ... हर हर गंगे...असा जय जयकार आणि मंत्रोच्चारात गोदामाईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे हजारो भाविकांच्या उपस्थितीत चांगल्या पर्जन्यासाठी मंगळवारी (दि.22) गोदामातेला साकडे घालण्यात आले.याानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकर्‍यांनी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून  गोदावरीचे पूजन केले. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुल्क यांनी पौराहित्य केले. ज्येष्ठ महिन्यातील शु. 1 ते 10 या कालावधीत सर्वत्र गंगा दशहरा उत्सव साजरा करून गंगापूजन केले जाते. गंगा गोदावरी मातेचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर ते ती सागरास मिळते ते पवित्र स्थळ राजमहेंद्री (आंध्रप्रदेश) अशा शेकडो मैलांच्या गोदाकाठावर जिथे शक्य होईल तिथे समर्थ सेवेकरी व भाविक दरवर्षी गंगापूजन  करतात. त्याचप्रमाणे यंदाही सेवेकर्‍यांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गोदा पूजन केले. या सोहळ्यास जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.