Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Nashik › युवतीवर सामूहिक बलात्कार; नाशिकच्या तिघांना सक्‍तमजुरी

युवतीवर सामूहिक बलात्कार; नाशिकच्या तिघांना सक्‍तमजुरी

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 17 2018 11:40PMनाशिकरोड : वार्ताहर 

प्रियकरास मारहाण करीत त्याच्या प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी तिघा आरोपींना 20 वर्षे सक्‍तमजुरी आणि प्रियकरासह प्रेयसीस मारहाण केल्याप्रकरणी इतर चौघांना सहा महिने कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 26 फेब्रुवारी 2014 मध्ये रोकडोबावाडी परिसरातील मळ्यात ही घटना घडली होती. 

जग्गू प्रदीप वानखेडे, केरू ऊर्फ प्रमोद सीताराम गरुड, तुषार ऊर्फ खुशा भगवान भदरंगे (सर्व रा. रोकडोबावाडी) या तिघांना सामूहिक बलात्कार प्रकरणी 20 वर्षे सक्‍तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर विजय साहेब उगले, कैलास गणेश बाराहाते (रा. मोरे मळा, जेलरोड), अनिल दिलीप संधानशिव (रा. वडनेर गाव), दीपक मच्छिंद्र डोखे (रा. रोकडोबावाडी) या चौघांना मारहाण केल्याप्रकरणी सहा महिने कारावास व प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

पीडित तरुणी तिच्या प्रियकरासह घटनेच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास  रोकडोबावाडी परिसरातील प्रसिद्ध अण्णा गणपती मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी सातही आरोपींनी दोघांना    दमदाटी आणि मारहाण केली. त्यानंतर तिघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. एस. बकाल यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. गायत्री पटनाला आणि अ‍ॅड. पंकज चंद्रकोर यांनी युक्‍तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयात 14 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तिघांना सक्‍तमजुरी तर चौघांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.