Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Nashik › चोरीच्या दुचाकीसह टोळी ताब्यात

चोरीच्या दुचाकीसह टोळी ताब्यात

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 11:42PMवावी : वार्ताहर

तालुक्यातील चास येथून चोरीला गेलेल्या पाच मोटारसायकल वावी पोलिसांनी हस्तगत केल्या असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाणे  हद्दीत गेल्या काही महिन्यांपूर्वी मोटारसायकल चोरींचे प्रमाण वाढले होते. मात्र अद्याप पर्यंत चोरीची उकल करणे पोलिसांना मुश्कील झाले होते. सुगावा लागत नसल्याने पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी अनेक वेळा वाहने तपासण्याचे आदेश दिले होते. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे व वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांचे वाहने तपासणीचे काम सुरु होते. या दरम्यान चास येथील 16 वर्षीय युवकाकडे  चोरीची होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एम.एच.15 सी.वाय.0347) मिळून आली. या  अल्पवयीन युवकाची अधिक चौकशी केली  असता, त्याने चास गावात आणखी चार  चोरीच्या मोटारसायकल विकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

याबाबत सखोल चौकशी केल्यावर चास येथून दोन होंडा शाईन व दोन बजाज प्लॅटीना तर एक बजाज डिस्कव्हर अशा एकूण पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. कारवाईत एकूण 1 लाख 75 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कामगिरीत वावी, संगमनेर, चाकण  पोलीस ठाण्याकडील एकूण पाच गुन्हे उघड झाले आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात चास येथील पाच युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तीन आरोपींचा ताबा संबंधित पोलीस ठाणे  घेणार असल्याची माहिती सहाय्यक पो. नि. आंधळे यांनी दिली आहे. 

सदर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार सैय्यद, प्रवीण अढांगळे, योगेश शिंदे, शशिकांत उगले, राजेंद्र केदारे, अजित जगधने, उमेश खेडकर दत्तू दराडे, सुधाकर चव्हाणके आदी कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले आहे.