Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › गणेशोत्सवात डीजे वाजविण्यावर प्रतिबंध

गणेशोत्सवात डीजे वाजविण्यावर प्रतिबंध

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 1:00AMत्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

गणेशोत्सव साजरा करताना डीजेवर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातलेली आहे. डीजेची ऑर्डर देणारा मंडळाचा प्रतिनिधी व डीजे मालक यांच्यावरदेखील गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्र्यंबकेश्‍वरमधील गणेशोत्सव मंडळांच्या झालेल्या बैठकीत पेठ व त्र्यंबकेश्‍वरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गोरे व त्र्यंबकेश्‍वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सांगितले.
याबरोबरच नियमांचे काटेकोर पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. नॉइज लेव्हल मीटर हे ध्वनिप्रदूषण डेसिबल यंत्र पोलीस स्टेशनला दोन सेट व उपअधीक्षक कार्यालयात एक सेट आणले असून, त्या मशीनवर आवाजाचे डेसिबल मोजता येणार आहे. 

दरम्यान, गणपती विसर्जनावेळी शेवटच्या गणपतीचे विसर्जन रात्री 12 वाजेपूर्वीच व्हावयास हवे, असेही बजावण्यात आले. 12 वाजेनंतर अजिबात चालणार नाही, याचीही नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत नगरसेवक सागर उजे यांनी मागे झालेल्या तहसीलदार कार्यालयातील बैठकीत नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार यांनी केलेल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. त्यांच्या घोषणेनुसार गणेशोत्सव मंडळाने ‘स्वच्छ त्र्यंबकेश्‍वर व सुंदर त्र्यंबकेश्‍वर’ तसेच प्रदूषणमुक्‍त त्र्यंबकेश्‍वर या विषयावर उत्कृष्ट देखावा सादर करणार्‍या प्रथम क्रमांक मिळविणार्‍या मंडळास 7 हजार रुपयेे, द्वितीय क्रमांक 5 हजार व तृतीय क्रमांक मिळविणार्‍या मंडळास तीन हजारांचे बक्षीस नगर परिषदेतर्फे देण्यात येणार आहे.

बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, गोपनीय शाखेचे अप्पासाहेब काकड आदींसह गणेशोत्सव मंडळाचे सनी तथा कुणाल उगले, नगरसेवक सागर उजे, सुयोग वाडेकर, गजानन घैसास, सागर पन्हाळे आदी उपस्थित होते.

त्र्यंबकराजा मंडळास प्रथम बक्षीस

मागील वर्षी झालेल्या गणेशोत्सवात नियमांचे संपूर्ण पालन व उत्कृष्ट देखावा याबाबतचे बक्षीस मृत्युंजय प्रतिष्ठान ‘त्र्यंबकचा राजा’ या मंडळास प्रथम क्रमांक देऊन मंडळाचे अध्यक्ष सनी (कुणाल) उगले यांचा गौरव करण्यात आला. तर प्रचितीराज मित्रमंडळास द्वितीय क्रमांक देण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच परशुराम मित्रमंडळाचे अध्यक्ष गजानन घैसास युथ फाउंडेशनचे नगरसेवक सागर उजे व भगवती मित्रमंडळाचे सागर पन्हाळे आदींना पुरस्कार दिले.