होमपेज › Nashik › नाशिक रोडला पोलिसांमुळे गाळे लिलावांवर ‘विघ्न’

नाशिक रोडला पोलिसांमुळे गाळे लिलावांवर ‘विघ्न’

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 12:02AMनाशिक : प्रतिनिधी

गणेश मंडळांना गणेश आरास व देखावे उभारण्यास आढेवेढे घेणार्‍या महापालिकेला पोलीस खात्यानेच दणका देत गणेशमूर्ती विक्रीचे गाळे थाटण्यास नकार दिला आहे. नाशिकरोडमधील 114 गाळ्यांना पोलीस खात्याने ना हरकत कळविल्याने तेथील गाळे विक्री लिलाव प्रक्रिया महापालिकेला गुंडाळावी लागली. 

गेल्या काही दिवसांपासून महापालिका आणि गणेश मंडळ यांच्यात मंडप परवानगी तसेच, भालेकर मैदानावर देखावे उभारण्यास परवानगी देण्यावरून संघर्ष सुरू होता. त्यात भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पालकमंत्र्यांच्या वतीने शिष्टाई केल्याने हा प्रश्‍न मार्गी लागला. नियम व अटीशर्तींबाबत मनपाने परिपत्रक प्रसिद्ध करून एक इंचही अधिक जागेवर मंडप थाटण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे कळविले होते. यामुळे गणेश मंडळांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. अखेर त्यावर तोडगा निघाला. परंतु, गणेशमूर्ती गाळ्यांचा लिलाव थाटणार्‍या महापालिकेला मात्र, पोलीस खात्याने नियमांचा रस्ता दाखवत लिलावच रद्द करण्याची वेळ आणली. महापालिकेने आधीच गाळ्यांचे लिलाव करण्यास विलंब केल्याने गेल्या दोन दिवसात 458 पैकी सहा विभागातून केवळ 13 गाळ्यांचा लिलाव झाला. त्यात पंचवटीतील 40 पैकी दहा गाळे तर सिडकोत तीन गाळ्यांना प्रतिसाद लाभला. यामुळे मनपाला आपल्याच चुकीमुळे महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. 

उत्पन्‍न वाढीसाठी प्रशासन एकीकडे प्रयत्न करत असताना गणेशमूर्ती गाळ्यांबाबत मात्र प्रशासनाची फसगत झाल्याने अवघ्या 35 ते 40 हजारावर समाधान मानावे लागले आहे. लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद न लाभल्याने आता कोणीही या अर्ज करा आणि गाळे थाटा अशी वेळ मनपावर आली आहे. नाशिकरोड येथे चेहेडी येथील 40 गाळे, बिटको चौक येथील 40 गाळे, जेलरोड पाण्याची टाकी येथील चार गाळे, देवळाली शिवारातील स. नं. 217 वरील 40 गाळे अशा एकूण 114 गाळ्यांना पोलीस खात्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांकडून आलेल्या हरकतींचे कारण देऊन ना हरकत दाखला नाकारला आहे. यामुळे मनपाला गाळ्यांचा लिलावच बंद करावा लागला. मनपाने उशिराने लिलाव प्रक्रिया तसेच, तांत्रिक बाजूंसाठी विलंब लावल्याने नाशिकरोडमधील अनेक गणेशमूर्ती विक्रेत्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.