Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Nashik › गणेशोत्सव भालेकर मैदानावरच

गणेशोत्सव भालेकर मैदानावरच

Published On: Sep 03 2018 1:41AM | Last Updated: Sep 03 2018 1:41AMनाशिक : प्रतिनिधी

महिनाभरापासून मनपा प्रशासन आणि बी. डी. भालेकर मैदानावरील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांमध्ये सुरू असलेल्या वादावर अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तोडगा काढला. ना. महाजन यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना गणेशोत्सवासाठी भालेकर मैदान उपलब्ध करून द्यावे, असे आदेश दिल्याची माहिती आ. देवयानी फरांदे यांनी दिली. 

बी. डी. भालेकर मैदानावर स्मार्ट सिटी अंतर्गत वाहनतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे मनपा आयुक्त मुंढे यांनी या मैदानावर यावर्षी गणेशोत्सवास परवानगी न देता पर्यायी मैदान म्हणून ईदगाह मैदानाचा पर्याय सुचवला. त्यातच महापौर-उपमहापौर व इतर लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून मुंढे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतल्याने वादास सुरुवात झाली. मात्र, बी. डी. भालेकर मैदान येथेच गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी मिळावी म्हणून सर्व गणेश मंडळ आग्रही होते. त्यामुळे गणेश मंडळ आणि मनपा प्रशासनात वादाची ठिणगी पडली होती. त्यातच पोलीस प्रशासनानेही ईदगाह मैदानावर गणेशोत्सवास विरोध केल्याने गणेश मंडळांसमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे आ. देवयानी फरांदे आणि गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे हा प्रश्‍न मांडला. त्यात महाजन यांनी मुंढे यांना गणेशोत्सवासाठी बी. डी. भालेकर मैदान उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महिनाभरापासून प्रलंबित असलेला हा प्रश्‍न आता मार्गी निघाल्याचे चित्र आहे.