Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Nashik › पंढरीचा वारकरी । वारी चुकू न दे हरी!

पंढरीचा वारकरी । वारी चुकू न दे हरी!

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:42PM

बुकमार्क करा
नाशिक : संदीप दुनबळे

जिल्हा परिषदेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले गणेश सोनवणे हे नाशिकचेच.  घरी आई, भाऊ-वहिनी, पत्नी, दोन मुली असा परिवार असलेल्या सोनवणे यांना वारीची तशी भारी आवड! मग, वारी पंढरपूरची असो वा त्र्यंबकेश्‍वरची, नित्यनेमाने ते ती पूर्ण करीत असतात. सोनवणे यांची वारी सुरू झाली ती वयाच्या 27 व्या वर्षी! आदल्या वर्षी कुतूहल म्हणून आळंदीला गेलेले सोनवणे यांनी ज्ञानेश्‍वर माउलींचा प्रस्थान सोहळा याचि देहि याचि डोळा अनुभवला.

अर्थात आळंदीला जाण्यामागचा हेतू हा प्रस्थान सोहळा पाहणे हाच होता. राज्याच्या कानाकोपर्‍यांतून या ठिकाणी दाखल झालेल्या भाविकांमध्ये 75 वर्षांचे आजोबा-आजी डोक्यावर गाठोडे घेऊन आलेले पाहिले. खिशात पैसे नसतानाही हे वृद्ध पायी पायी आले, ते केवळ अन् केवळ माउलींच्या जिव्हाळ्यापोटीच! या वृद्धांची निष्ठा आणि श्रद्धा पाहिल्यानंतर सोनवणे यांनी त्याच ठिकाणी वारी करण्याचा संकल्प केला. भाऊ आणि वहिनी दरवर्षी वारी करीतच असत. त्यांच्याबरोबर दुसर्‍या वर्षापासूनच सोनवणे यांनी वारी सुरू केली. आळंदीला पायी जात असताना खूप पाऊसही पडला. चिखलात झोपण्याचाही प्रसंग आला.

पण, तरीही हिंमत न हारता पुढे मार्गक्रमण केले आणि आळंदी गाठलीच. सोनवणे यांची ही पहिलीच वारी. त्यानंतर मात्र वारीविषयी गोडी निर्माण झाली. मग न चुकता वारी करू लागले. जीवनाचे काही तरी सार्थक व्हावे म्हणून एक  तरी वारी करावी, असे सोनवणे यांना वाटत होते. त्यांचा हा संकल्प ते दरवर्षी न चुकता वारी करून तडीस नेत असतात. सतरा दिवस पालखीसोबत पायी चालून आळंदीला पोहोचल्यावर तीन दिवसांचा मुक्‍काम असतो. त्यानंतर परतीचा प्रवास मात्र बसने असतो. सोनवणे हे सरकारी कर्मचारी असून, त्यांची धार्मिक आवड बघून अधिकारीही आढेवेढे न घेता, सुट्ट्या मंजूर करतात. वारीने सोनवणे यांच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडून आले आहेत.

व्यसनापासून मुक्‍ती मिळाली ती वारीमुळेच, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय आत्मिक समाधान लाभत असून, आयुष्यातील मोह-मायांपासून दूर झाल्याचेही ते सांगतात. अध्यात्माकडे पाय वळाले ते वारीमुळेच! वारीमुळेच स्वभावात बदल झाला आणि कौटुंबिक जीवनातही आनंद दिला. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्याचे वय असताना वारीला जाणे रुचणारे नव्हते. पण, ज्यावेळी व्यसनमुक्‍त झालो, त्यावेळी मात्र कुटुंबातील सदस्य समाधानी झाले. 

सकारात्मक दृष्टिकोन 

वारीमध्येच नवीन सोबती मिळाले. माउलीच्या नावाचा गजर करीत मार्गक्रमण करताना थकवाही जाणवत नाही.  एखाद्या गावात मुक्‍काम असतो, त्यावेळी ग्रामस्थांकडून मिळणारी आपुलकीची वागणूक पाहून आपली माणसं भेटल्यासारखीच वाटतात, असा अनुभव सोनवणे यांनी कथन केला. वारीहून परल्यानंतर परिसरातील लोकांचा आणि कार्यालयातील सहकार्‍यांचा पाहण्याचा द‍ृष्टिकोनही बदललेला असतो. त्यांच्याकडून मिळणार्‍या वागणुकीत एक आदराची भावना असते. वारीत असताना तहान-भूक हरपून असते ती केवळ अन् केवळ माउलीच्या दर्शनाची आस... जीवनात मार्गक्रमण करताना सकारात्मक द‍ृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवण्याची दिशा दिली ती वारीनेच, असे सोनवणे यांनी सांगितले.