Wed, Jul 17, 2019 00:08होमपेज › Nashik › मनपावर मोर्चाचा गणेश मंडळांचा इशारा

मनपावर मोर्चाचा गणेश मंडळांचा इशारा

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीच्या मुद्यावरून एक महिन्यापासून मंडळ आणि मनपा प्रशासन यांच्यात वाद सुरू आहेत. परंतु, अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. यासंदर्भात गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून आयुक्‍तांशी चर्चा करून आम्हाला दिलासा द्या, अशी मागणी केली असता ते माझेही ऐकणार नाहीत, आता तुम्हीच काय ते करा, अशा शब्दात पालकमंत्र्यांनीच आयुक्‍तांसमोर हतबलता व्यक्‍त केली. पालकमंत्र्यांनीच माघार घेतल्यामुळे आता येत्या चार दिवसांत महापालिकेवर मोर्चा काढण्याबरोबरच शहरात शासन व प्रशासनाच्या विरोधात निषेध गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतर रात्री उशिरा आयुक्तांनी करवाढीप्रमाणेच नमते घेत रितसर अर्ज आल्यास भालेकर मैदानावर परवानगी देण्याचा पवित्रा घेतला. तथापि मंडपाचा आकार व इतर सवलतींबाबत गणेश मंडळे ठाम असल्याने अद्यापि संघर्षाचे चित्र कायम आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे गटनेते सलीम शेख यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या भेटीसाठी महापालिकेत सोमवारी (दि.3) गेले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार शहरासह परिसरातील गणेशोत्सव मंडळांना आरास आणि देखावे उभारण्यासाठी अटी शिथिल करून परवानगी द्यावी, अशी मागणी महामंडळातर्फे करण्यात आली. त्यावर आयुक्‍तांनी अग्निशमन विभागाची परवानगी तसेच नियमांमध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात येईल, मात्र मनपाच्या बांधकाम खात्याने मंजूर केलेला जागेचा नकाशा असल्याशिवाय कोणत्याही मंडळाला परवानगी दिली जाणार नाही, असा पवित्रा आयुक्‍तांनी घेतला. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन केले जाईल. एक इंचदेखील जादा परवानगी दिली जाणार नाही, असे ठाम मत आयुक्‍तांनी मांडले. गावठाण भागात रस्ते छोटे छोटे असल्याने त्या ठिकाणी तर परवानगीच देता येणार नाही, असेही आयुक्‍तांनी सांगितल्याने गेल्या 35 ते 40 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करणार्‍या अनेक मंडळांसमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपाकडून केवळ श्रेयवादासाठी ही लढाई खेळली जात आहे. आधी अडवणूक करायची आणि नंतर त्यावर तोडगा काढायचे असे राजकारण सध्या भाजपाकडून सुरू असल्याचा आरोपही शेलार यांनी केला. 

मुंढे यांनी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचे ऐकून न घेतल्याने अध्यक्ष समीर शेटे यांनी पालकमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. केवळ दहा दिवस बाकी असल्याने परवानगी मिळाली नाही तर कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊ शकतो, यामुळे तुम्हीच तोडगा काढा, असे साकडे शेटे यांनी घातले. त्यावर तुम्ही काय तो निर्णय घ्या, असे सांगत पालकमंत्र्यांनी आयुक्‍तांसमोर हतबलता व्यक्‍त केली. यावेळी पद्माकर पाटील, देवांग जानी, कैलास मुदलियार, बबलूसिंह परदेशी, रामसिंग बावरी, गणेश बर्वे, रमेश कडलग आदी उपस्थित होते. 

.. तर मोर्चा अन् निषेधाचे फलक लावू 

मुंढे यांच्या या धोरणामुळे महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्‍त करत शासन आणि प्रशासन मंडळांची अडवणूक करत असेल तर त्याविरोधात प्रत्येक विभागात मंडळांमार्फत जनजागृती निर्माण करून महापालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा निर्णय अध्यक्ष समीर शेटे व गजानन शेलार यांनी जाहीर केला. तसेच शहरातील गणेश मंडळे देखावे व सजावट न करता शासन व प्रशासनाच्या निषेधाचा फलक लावून गणेशोत्सव साजरा करतील, असा इशाराही त्यांनी दिला.