Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Nashik › गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आयुक्‍तांच्या बैठकीवर बहिष्कार 

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आयुक्‍तांच्या बैठकीवर बहिष्कार 

Published On: Aug 01 2018 1:29AM | Last Updated: Aug 01 2018 1:29AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍तांनी मंगळवारी (दि.31) अंगारकी चतुर्थीला शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या बैठकीवरच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकत आयुक्‍तांविरोधात घोषणाबाजी केली. महापौरांसह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांचे अधिकार डावलून आयोजित केलेली बैठक आणि बी. डी. भालेकर मैदानावर गणेश देखावे उभारण्यास आयुक्‍तांनी नकार दिल्याने या बैठकीत खडाजंगी होणार असल्याचे चित्र आधीच निर्माण झाले होते. यामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. आयुक्‍तांकडून हुकूमशाही केली जात असल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले. 

सप्टेंबर महिन्यात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाची तयारी एक महिना अगोदरपासूनच केली जाते. त्याच अनुषंगाने दरवर्षी बी. डी. भालेकर मैदानावर गणेश आरास साकारणार्‍या मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्‍तांची भेट घेत परवानगी मागितली. परंतु, आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी भालेकर मैदानावर वाहनतळाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने परवानगी नाकारली. गणेशोत्सवास अद्याप एक ते दीड महिना बाकी असल्याने तोपर्यंत मैदानावरील काम (पान एकवरून) पूर्ण करण्यास ठेकेदाराला आदेश द्यावे, अशी सूचनावजा मागणी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली असता आयुक्‍तांनी स्पष्टपणे नकार देत तपोवनाचा रस्ता दाखविला. यामुळे कार्यकर्त्यांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी या निर्णयाचा निषेध करत आयुक्‍तांनी गणेश उत्सवाबाबत अशीच भूमिका ठेवल्यास गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

या इशार्‍यामुळे प्रशासनाने पुन्हा कार्यकर्त्यांना बोलावून गोल्फ क्‍लबवरील इदगाह मैदानाचा पर्याय सुचविला. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संबंधित ठिकाण योग्य ठरणार नसल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी पर्याय नाकारत भालेकर मैदानाबाबतची भूमिका कायम ठेवली. याबाबत गणेश मंडळांनी महापौरांसह विरोधी पक्षनेत्यांना पत्र देत आपली भूमिका मांडली. महापौर रंजना भानसी यांनीदेखील आयुक्‍तांना बैठक घेण्याविषयी पत्र दिले होते. परंतु, त्या पत्रास उत्तर न देता प्रशासनाने थेट जाहीर नोटीस प्रसिध्द करून गणेश मंडळांना बैठकीसाठी आमंत्रित केले. प्रशासनाने पदाधिकारी व महापौरांनाच डावलल्याने तसेच भालेकर मैदानाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता आयुक्‍तांनी बोलाविलेल्या बैठकीत खडाजंगी होणार असल्याची शक्यता होती. त्यानुसार मंगळवारी मनपा मुख्यालयात बोलाविलेल्या बैठकीस शहरातील बहुतांश सर्वच मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. परंतु, आयुक्‍त मुंढे बैठकीला आलेच नाही.

प्रशासनातर्फे अतिरिक्‍त आयुक्‍त किशोर बोर्डे, उपायुक्‍त हरिभाऊ फडोळ आणि मुख्य लेखा अधिकारी सुहास शिंदे यांनी हजेरी लावली. प्रशासनातर्फे अधिकारी बोलण्यास उठताच माजी महापौर विनायक पांडे तथा शिवसेवा गणेशोत्सव मित्र मंडळाचे संस्थापक विनायक पांडे यांनी अधिकार्‍यांना थांबवत आम्हाला बोलू द्या, असे सांगून महापौर आणि इतर पदाधिकारी कुठे आहेत. त्यांना का बोलविले नाही, असा जाब विचारला.

त्यावर काय उत्तर द्यावे, असा प्रश्‍न अधिकार्‍यांसमोर निर्माण झाला. महापौर आणि पदाधिकारी नसतील तर आम्ही बैठकीला थांबणार नाही, असे सांगत सर्वच कार्यकर्त्यांनी आयुक्‍त मुंढे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृह सोडले. मनपात अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे कर्मचारी बाहेर आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बैठकीस विनायक पांडे, गजानन शेलार यांच्यासह रामसिंग बावरी, लक्ष्मण धोत्रे, पदमाकर गावंडे, विजय बिरारी, गणेश बर्वे, हेमंत जगताप, सचिन रत्ने, चेतन शेलार, प्रवीण जाधव आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

महापौरांच्या अधिकारांवर गदा 

महापौरांसह पदाधिकार्‍यांच्या अधिकारांवर आयुक्‍तांकडून गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गणेशोत्सवाबाबतचे नियोजन करण्यासाठी महापौर बैठक बोलवत असतात. परंतु, आयुक्‍तांनी मात्र महापौरांना विश्‍वासात न घेताच बैठक बोलविल्याने बैठकीस आलेल्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. बैठक घ्यायची असेल तर महापौर, पदाधिकार्‍यांना बोलवा. मगच बैठक होईल. अन्यथा नाही, असा इशारा विनायक पांडे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, रामसिंग बावरी, बबलूसिंह परदेशी, गणेश बर्वे यांनी दिला. 

मनपा पदाधिकार्‍यांचाही बहिष्कार 

आयुक्‍तांनी बोलविलेल्या बैठकीस मनपातील महापौरांसह एकाही पक्षाच्या पदाधिकार्‍याने हजेरी न लावता बहिष्कार टाकला. बैठकीला कोणीही नगरसेवक वा पदाधिकारी यांनी जाऊ नये, असे निरोप देण्यात आले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून करयोग्य मुल्य दरवाढ, अंगणवाडी यासह विकास कामांवरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुरू असलेल्या घडामोडींची पार्श्‍वभूमीदेखील या बहिष्कारामागे आहे.