होमपेज › Nashik › ‘जीएसटी’ने घटवला चारचाकींचा लक्ष्यांक

‘जीएसटी’ने घटवला चारचाकींचा लक्ष्यांक

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:32PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या चारचाकी योजनेचा लाभ अवघ्या 75 लाभार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीत वाढ झाल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने बहुतांश लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

मागासवर्गीय घटकातील युवकांना स्वयंरोजगासाठी मालवाहतूक चारचाकी वाहन योजना तत्कालीन समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांच्या कार्यकाळात अस्तित्वात आली. गेल्या वर्षी या योजनेतून 102 लाभार्थ्यांना वाहन देण्यात आले. यावर्षीही योजना राबविण्यात येणार असली तरी प्रशासकीय कार्यवाही कासवगतीने सुरू आहे. तसेच यावर्षी योजनेचे उद्दिष्टही घटणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. योजनेसाठी निधीची तरतूद पूर्वीप्रमाणेच आहे. पण, जीएसटी लागू झाल्याने वाहनांच्या किमतीत वाढ झाली आहे. 

तसेच बीएस थ्री इंजिन वाहने बंद होऊन बीएस फोर इंजिन असलेली वाहने बाजारात आली आहेत. त्यामुळेही किमतीत भर पडली आहे. त्यामुळे तरतूद दोन कोटी रुपये असताना प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या मात्र घटणार आहे. जिल्ह्यातील 75 लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे, गेल्यावर्षाच्या तुलनेत 28 ने लाभार्थी कमी झाले आहेत. एक तर योजनेला प्रतिसाद लाभत असताना सर्वच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नसल्याचेही उजेडात  आले आहे.

शिफारसपत्रे कोणाला द्यावीत

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात एक याप्रमाणे या वाहनांचा लाभ दिला जाणार आहे. आता एकच वाहन मिळणार असल्याने त्यासाठी शिफारसपत्र नेमके कोणाला द्यावे, असा प्रश्‍न सदस्यांना पडला आहे. त्यातही एकालाच शिफारस पत्र मिळणार असल्याने अन्य इच्छुक लाभार्थ्यांचा हिरमोड होणार आहे. शिवाय त्यांच्या नाराजीचा सामनाही सदस्यांना सहन करावा लागणार आहे.