Sun, Jan 20, 2019 16:50होमपेज › Nashik › फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 12:15AMनाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि.2) सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन व भवानी पाझर तलावाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळेच गेल्या चार महिन्यांपासून उद्घाटनाच्या मुद्यावरून वादात सापडलेली ट्रॉली भाविकांच्या सेवेत रुजू होणार आहे. 

नाशिक शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता शिथिल होताच जिल्ह्यातील विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू होणार आहे. पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस हे गडावरील ट्रॉलीचे उद्घाटन करणार आहेत. आधी ठरलेल्या दौर्‍यानुसार मंगळवारी (दि.3) हा सोहळा होणार होता. मात्र, आता एक दिवस अगोदरच ट्रॉली भाविकांसाठी खुली होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यमंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

सप्तशृंगगडावर उभारण्यात आलेली फ्यूनिक्युलर ट्रॉली ही देशातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. एकावेळी 60 व्यक्ती वाहून नेण्याची क्षमता असलेली ही ट्रॉली अवघ्या अडीच मिनिटांमध्ये भाविकांना देवीच्या गाभार्‍यापर्यंत पोहोचवणार आहे. यासाठीचे दर हे प्रतिव्यक्ती 80 रुपये ठरविण्यात आले आहे. दरम्यान, ट्रॉलीच्या उद्घाटनासह गडावरील भवानी पाझर तलावाचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री करणार आहेत.