होमपेज › Nashik › फुंडकर यांनी दिली होती ‘शत-प्रतिशत’ची घोेषणा

फुंडकर यांनी दिली होती ‘शत-प्रतिशत’ची घोेषणा

Published On: Jun 01 2018 12:23PM | Last Updated: May 31 2018 10:40PMनाशिक : प्रतिनिधी

भाजपाला तळागाळात पोहोचविण्यासाठी ‘शत-प्रतिशत’ अशी घोषणा नाशिकमध्ये देऊन महाराष्ट्रात पक्षाला राजकीय प्रवेश मिळवून देण्याचे कार्य पांडुरंग फुंडकर यांनी केले. त्यांच्या निधनाने नाशिकशी संंबंधित त्यांच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष फुंडकर यांचे निधन झाल्याने नाशिकमधील त्यांच्याशी जवळीक आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाकवी कालिदास कलामंदिरात सन 2000 मध्ये भाजपाचे प्रदेश अधिवेशन बोलविण्यात आले होते. याच अधिवेशनात पक्षाने फुंडकर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आणि याचवेळी प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी ‘शत-प्रतिशत’ भाजपा ही घोषणा देऊन सर्वच राजकीय पक्षांना हादरवून टाकण्याचा प्रयत्न केला. काही विशिष्ट समाजापुरताच मर्यादित असलेला पक्ष बहुजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी शत-प्रतिशतच्या माध्यमातून प्रयत्न केले. ही घोषणा नाशिकमधून होताच इतर राजकीय पक्षांकडून भाजपावर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु, या सर्व आरोपांना फुंडकर यांनी परतवून लावत भाजपाला ग्रामीण भागात तसेच तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.

त्यानंतर त्र्यंबकेश्‍वर येथे थेटे मंगल कार्यालयात झालेल्या जिल्हा बैठकीलाही ते नाशिकला आले होते. शहरी भागात पक्षाचे काम पोहोचले होते. मात्र, ग्रामीण भागात भाजपाचे कोठेही निशाण नसल्याने फुंडकर यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील गावन्गाव पिंजून काढत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्याचे काम केले. यामुळेच त्यांची ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांशी जवळीक निर्माण होऊन ते लोकप्रिय नेते म्हणून गणले जाऊ लागले.