Tue, Jul 16, 2019 09:53होमपेज › Nashik › इंधन दरवाढीचा भडका

इंधन दरवाढीचा भडका

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 22 2018 10:46PMनाशिक : प्रतिनिधी 

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ आणि शासनाचे कर यामुळे देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. नाशिकमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 82.36 पैसे, तर डिझेल दर 68.95 पैशांवर पोहचले आहे. महागाईने त्रस्त झालेल्या सामान्यांना आता इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल व डिझेलच्या दराने रेकॉर्डब्रेक केले असल्याचे बोलले जात आहे. दरवाढीमुळे वाहनचालकांकडून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. दरम्यान, पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली जात आहे.

केंद्र शासनाने गेल्या 16 जून 2017 पासून डायनॅमिक फ्युअल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्युअल प्राइस सिस्टीमची सुरुवात केली.  तेव्हापासून देशात पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढच झाली. तर नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात 6.53 रुपये प्रतिलिटरने वाढ होऊन ते आता 82.36 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेलच्या किमतीत 18.3 रुपयांनी वाढ झाली असून, ते 68.95 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पेट्रोलच्या चढउतार होत असला तरी किमान इंधनावरील कर कमी होऊन पेट्रोल -डिझेलच्या किमती कमी होतील, अशी नाशिककरांना अपेक्षा आहे. पेट्रोलच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण डायनॅमिक फ्युअल प्राइसिंग प्रणाली असून, प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्युअल प्राइस सिस्टीमची सुरुवात गेल्या 16 जूनला लागू करण्यात आली. या सिस्टीमनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसारच बाजारातील पेट्रोलच्या किमतीत चढ-उतार होत आहे. मागील सात ते आठ महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गाडीत इंधन भरताना वाहनचालकांना विचार करण्याची वेळ आली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच पेट्रोलचा दर हा 82 रुपये  तर डिझेलचे दर हे 68 रुपये प्रतिलिटर पलीकडे गेले आहेत. भरमसाट दरवाढीमुळे अगोदरच सर्वसामान्य मेटाकुटीला आले होते.  पुन्हा नवी दरवाढ लागू झाल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.  सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर ठरविण्याचे सर्व अधिकार हे तेल कंपन्यांना दिले आहेत. मागील सात ते आठ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शासनाने दरवाढीचे अधिकार स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी भाजीपाला व दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असून,  पुन्हा एकदा महागाईला तोंड द्यावे लागेल. 

Tags : nashik, nashik news, Fuel price hike, Severe anger, against government,