Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Nashik › दामदुपटीचे आमिष; अनेकांना कोट्यवधींचा गंडा

दामदुपटीचे आमिष; अनेकांना कोट्यवधींचा गंडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गुंतवणूक केलेल्या पैशांचा दामदुप्पट परतावा देण्याचे आमीष दाखवून एका कंपनीच्या  संचालकांनी कोट्यवधी रुपयांना गंडवल्याची तक्रार नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी भद्रकाली पोलिसांकडे केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम न देता नाशिकमध्ये आलेल्या संशयित त्रिकुटाने आणखी एक कंपनी सुरू करून नाशिककरांना गंडा घालण्यास सुरुवात केल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. 

याप्रकरणी चिंचोली मोराची (ता. शिरुर, जि. पुणे) येथील गुंतवणूकदारांनी सोमवारी (दि.2) भद्रकाली पोलिसांना लेखी तक्रार दिली असून याप्रकरणी चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन पोलिसांनी दिले आहे.  प्रवीण एस. वरगुडे, राजेंद्र एस. जेजुरकर, दिगंबर बैरागी (रा. संवत्सर, ता. कोपरगाव, जि. नगर) अशी या तिघा संशयितांची नावे आहेत. विठ्ठल शंकरराव धुमाळ (रा. चिंचोली मोराची, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी 2016 मध्ये संशयित प्रवीण वरगुडेसह तिघे चिंचोली मोराची येथे आले. व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट परतावा देण्याचे आमीष संशयितांनी धुमाळ यांना दाखवले. त्यामुळे धुमाळ यांच्यासह गावातील अनेकांनी   संशयितांच्या कंपनीत  सुमारे 2 कोटी 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली. संशयित वरगुडे याने परत करणार्‍या रक्कमेचे आगाऊ धनादेश दिले.

मात्र ते धनादेश बँकेत टाकण्यापूर्वी नागरिकांकडून पुन्हा परत घेत पुढील वर्षाचे धनादेश दिले. अशा प्रकारे त्याने आता एप्रिल 2018 चे धनादेश देत सर्वांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.  दरम्यान, संशयितांनी कोपरगाव परिसरातही अनेकांची फसवणूक केल्याने त्यांनी तेथून मुक्काम हलवत नाशिकच्या द्वारका परिसरातील बोडके प्लाझामध्ये कार्यालय थाटल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. संशयितांनी सक्सेस ट्री फार्म नावाने कंपनी सुरु केली असून कंपनीमार्फत कोट्यवधी रुपये जमा केले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संशयितांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदारांच्या दाव्यानुसार संशयितांनी नाशिक, पुणे जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना सुमारे 35 ते 40 कोटी रुपयांना गंडवल्याचा संशय व्यक्‍त केला आहे.

Tags : Nashik, Nashik News, investment, double, benefit, fraud, many people 


  •