Sun, Jan 20, 2019 14:20होमपेज › Nashik › नाशिक ते कल्याण लोकल रेल्वेसेवा सुरूहोणार

नाशिक ते कल्याण लोकल रेल्वेसेवा सुरूहोणार

Published On: May 19 2018 1:34AM | Last Updated: May 19 2018 12:05AMउपनगर : वार्ताहर

नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला जोडणारी लोकल रेल्वेसेवा सुरू होणार असून, ताशी 50 किमी वेग असणारी ही लोकल येत्या ऑक्टोबरपर्यंत नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. दिल्लीच्या मेट्रोसारख्या सुखसोयी या ट्रेनमध्ये असणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासाला या लोकलमुळेे चालना मिळणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या मागणीप्रमाणे आणि रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांच्या संकल्पनेने ही सेवा नाशिककरांना मिळणार असल्याने आनंद व्यक्‍त होत आहे. 

नाशिक ते मुंबई प्रवासासाठी अनेक रेल्वेगाड्या आहेत. मात्र, या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. अनेक प्रवाशांना काही मुख्य स्टेशनवर उतरून लहान स्टेशनवर जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जनतेसाठी रेल्वे विभागाकडे कसारा ते नशिक लोकलची मागणी केली होती. मात्र, कसारा ते नाशिक लोकल सुरू केल्यास ही लोकल तोट्यात जाईल, असा निकष रेल्वेने काढला होता. म्हणून रेल्वे बोर्डाने या गोष्टीचा अभ्यास करून रेल्वे अधिकारी, प्रवासी यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचनांमध्ये रेल्वे इंजिनतज्ज्ञ आणि इगतपुरी स्थानकातील निवृत्त मुख्य इंजिन निरीक्षक वामन सांगळे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्फत 2016 मध्ये कल्याण ते नाशिक रेल्वे सुरू करावी, अशी सूचना मांडली होती. ही सूचना ध्यानात घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेला हिरवा कंदील दाखवला होता. नाशिककरांच्या सेवेत ही लोकल ऑक्टोबरमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत रेल्वेच्या सूत्रांनी दिले आहेत. डीएमयू (डीझेल मल्टिपर्पज युनिट) वर चालणारी ही लोकल कालांतराने ईएमयू (इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट) वर सुरू करणार आहे.  ही लोकल लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी नाशिककर आतुरतेने वाट पाहत आहेत.

मी लोकसभेत मागणी केल्यानुसार रेल्वे मंत्रालयाने या गाडीसाठी हिरवा कंदील दाखवला असून, याचे काम वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. यासाठी तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू असून, या लोकलचा फायदा शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक अशा सर्वांनाच होणार आहे, असे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.कल्याण ते नाशिक दरम्यान येणार्‍या स्थानकांना लोकलमुळे लाभ मिळणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे प्रवाशांची एका स्थानकावरून दुसर्‍या स्थानकापर्यंत होणारी पायपीट वाचेल. ही गाडी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली असून, मेट्रोप्रमाणे सोयी सुविधा असणार असल्याची माहिती रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे यांनी दिली.