Fri, Jul 19, 2019 01:04होमपेज › Nashik › नाशिक-दिल्ली विमानसेवा आजपासून

नाशिक-दिल्ली विमानसेवा आजपासून

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 10:53PMनाशिक : प्रतिनिधी

देशभरात उडान योजनेंतर्गत प्रथम अलाहाबाद, दुसरे हुबळी व तिसर्‍या क्रमांकाचे स्थान नाशिकला मिळाले आहे. उडान योजनेंतर्गत नाशिक -दिल्ली विमानसेवेला शुक्रवारी (दि.15) दुपारी 12.30 वाजता प्रारंभ होणार आहे. पहिल्या यादीत नाशिकसाठी मुंबई व पुणे अशी दोन शहरे जोडली गेली होती.  एअर डेक्कन कंपनी ही सेवा देत आहे. उडान योजनेंतर्गत दुसर्‍या यादीत नाशिक-दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, गोवा, भोपाळ आणि हिंडण अशा सात शहरांना जोडले जाणार आहे. या सात शहरांना जोडण्यासाठी जेट एअरवेज टूजेट,इंडिगो,     स्पाईसजेट व एअर अलायन्स अशा अनुभवी एअर लाइन्सला मान्यता मिळाली आहे. उडान योजनेंतर्गत नाशिक शहराला नऊ राज्यांतील मुख्य शहरे जोडली जाणार आहे. नाशिक देशाच्या राजधानीला जोडले जाणार आहे. निश्‍चितच नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. इतरही सहा शहरे जुलैअखेर सुरू करण्याचे उद्दिष्ट केंद्रीय उडान मंत्रालयाने एअर कंपन्यांना दिले आहे.  

कार्यक्रमास जेट एअरवेजचे प्लॅनिंग अ‍ॅण्ड रेव्हिन्यू विभागाचे व्यवस्थापक शिवकुमार, महापौर रंजना भानसी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, उपमहापौर प्रथमेश गिते, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मनीष रावल, दलजित सिंग आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  नाशिक हे धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग, नाशिकहून 90 किलोमीटर अंतरावर असलेले शिर्डी देवस्थान असल्यामुळे देशभरातील भाविकांना ही विमानसेवा उपयुक्त आहे. तसेच औद्योगिकदृष्ट्या मुंबई-पुण्यानंतर नाशिकचा विकास होत आहे. तसेच देश-विदेशातील वायनरीप्रेमींनादेखील या सेवेचा लाभ घेता येईल. त्यामुळे भाविक, पर्यटक,  उद्योजक आणि व्यापार्‍यांचा या सेवेला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.तसेच नाशिककरांनाही दिल्लीसह त्याच्या आजूबाजूच्या विमानसेवेचा लाभ माफक दरात मिळणार आहे.