Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Nashik › दहा रुपयाच्या नाण्यामुळे बालिकेचा मृत्यू

दहा रुपयाच्या नाण्यामुळे बालिकेचा मृत्यू

Published On: Feb 05 2018 1:41PM | Last Updated: Feb 05 2018 6:24PMनाशिकरोड : वार्ताहर              

नाशिक-पुणे रोड जवळील चांदगिरी गावात एका चार वर्षाच्या मुलीच्या घशात दहा रुपयाचे नाणे अडकल्याने तिचा मृत्यू झाला. मुलीवर वेळेत उपचार झाले नसल्याने चिमुकलीला जीव गमवावा लागला असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. वैद्यकीय व्यवस्‍थेच्या गलथान कारभारामुळे मुलीला जीव गमवावा लागला असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.  

शालिनी दत्तात्रय हांडगे (वय ४ वर्ष, रा. चांदगिरी) असे मुलीचे नाव आहे . रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घटना घडली.शालिनी घराजवळ खेळत होती. तिच्या हातात आई ज्योती हिने दहा रुपयाचे नाणे दिले होते. यावेळी खेळत असताना दहा रुपयाचे नाणे तिच्या घशात अडकले. यानंतर शालिनी झोपी गेली होती, झोपून उठल्‍यानंतर आईने तिला नाण्याबद्दल विचारले तेव्‍हा तिने घशाकडे हात दाखविला. मुलीने हे सांगताच गावातील डॉक्‍टरकडे तिला घेऊन जाण्यात आले. तपासणीनंतर एक्‍स रे काढणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मुलीला नाशिकरोड येथे घेऊन जाण्यास सांगितले. एक्सरे काढल्‍यानंतर तिच्या घशात नाणे अडकल्याचे लक्षात आले. बिटको रुग्णालयात अत्‍याधुनिक सोय नसल्याने पुढील उपचारकरिता आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.  मात्र येथे उपचारादरम्यान शालिनीचा मृत्यू झाला.

वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू – दत्तात्रय हांडगे, मुलीचे वडील 

आम्ही आदिवासी कुटुंबातील आहोत , माळेगाव एमआयडीसीमधील अमेरिकन ड्राय फ्रुट कंपनीत वाहनात माल लोडिंग करण्याचे काम करतो. आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. बिटको रुण्गणालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी केवळ एक्‍सरे काढला. एक्‍सरेनंतर आडगाव येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्‍ला देण्यात आला, आम्‍ही दाखल केलेही. मात्र संबंधित विभागाचे डॉक्‍टर बाहेर गेल्याचे सांगून काही त्रास होणार नाही असे सांगितले. रविवारी रात्री पुन्‍हा मुलीला त्रास जाणवू लागला. यावेळी डॉक्‍टरांकडे आम्‍ही धाव घेतली मात्र वेळेत मुलीला उपचार मिळाले नसल्याने मुलीचा बळी गेल्याचे सांगण्यात आले.यावेळी त्‍यांनी प्रशासनामुळे आमच्या मुलीचा बळी गेल्याचे सांगितले. 

माझी शालिनी गेली कुठे 
शालिनीचा मृत्यू दहा रुपयाचे नाणे घशात अडकल्याने गेला आहे. रुग्णलायात दाखल करूनही उपचारअभावी मृत्यू झाल्याने सर्वस्‍तरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. मुलीचे आई दिवसभर तिचे उपचाराअभावी होणारे हाल पहात होती. मात्र शालिनीचा मृत्यू झाला तेव्‍हा तिची आईला नेमकं आपल्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला हेच कळत नव्‍हते. 

तर वाचला असता जीव

शालिनीच्या आई वडिलांची आर्थिक परस्थिती अंत्यंत हलाखीची आहे. शिंदे –जाखोरी रोडवरील रस्त्याकडेला एका झोपडीत हे कुटुंब वास्तव्यास आहे. उपचाराला पुरेसे पैसे नसल्याने शालिनीला महापालिकेच्या बिटको आणि मेडिकल कॉलेज येथे उपचाराकरिता दाखल केले. पुरेसे पैसे अन्‌ आवश्यक उपचार मिळाले असते तर शालिनीचा जीव वाचला असता ,अशी चर्चा केली जात आहे.     

शोकाकुल वातावरणात निरोप

सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चांदगिरी गावात अंत्यंत शोकाकुल वातावरणात शालिनी हिच्यावर अंतसंस्कार करण्यात आले. शालिनी बालवाडीत शिकत होती तिचा मोठा भाऊ ऋषिकेश हा दुसरीत शिक्षण घेत आहे.