Fri, Jul 19, 2019 07:34होमपेज › Nashik › वाळू वाहतूक करणारी चार वाहने केली जप्त 

वाळू वाहतूक करणारी चार वाहने केली जप्त 

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 16 2018 10:44PM

बुकमार्क करा
नाशिक :

नंदुरबारमधून शहरात चोरट्या मार्गाने वाळू आणणार्‍या चार वाहनांवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या भरारी पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी ही वाहने जप्त केली. दरम्यान, या वाहनांच्या मालकांकडून सात लाखांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. पर्यावरणाचे निकष पाळले जात नसल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने राज्यातील वाळू घाटांच्या लिलावावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळू उत्खननावर टाच आली आहे. परिणामी जिल्ह्यातील 48 घाटांचे लिलाव थांबले असतानाच आता शहरात नंदुरबारमधून चोरट्या मार्गाने वाळू आणली जात आहे, हे विशेष म्हणावे लागेल.

आडगाव नाका येथे महसूल प्रशासनाने गेल्या आठवड्यात एक वाहन ताब्यात घेतले होते. संबंधित वाहनात आठ ब्रास वाळू आढळून आली होेती. प्रशासनाने वाहनमालकाकडून पावणे दोन लाखांचा दंड वसूल केला. ही घटना ताजी असतानाच भरारी पथकाला रविवारी (दि. 14) मुंबई-आग्रा महामार्गावर वाळूची वाहतूक करणारी चार वाहने आढळली. पथकाने संबंधित वाहनांचा पाठलाग करून अडवली. यावेळी या चारही वाहनांच्या चालकांकडे वाळू वाहतूकीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांच्याजवळ कोणतीच कागदपत्रे सापडली नाही. परिणामी प्रशासनाने ही वाहने ताब्यात घेतली आहे.

सरकारी नियमानुसार चारही वाहनांच्या मालकांकडून बाजारभावाच्या पाचपट दंड वसुली करण्यात येत आहे. खुल्या बाजारात सध्या एक ब्रास वाळूसाठी 5 हजार रुपये मोजावे लागत आहे. त्यानुसार पाचपट दंडाची रक्‍कम म्हणजेच 25 हजार रुपये ब्रास याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. एका ट्रकमध्ये अंदाजे 7 ब्रास वाळू बसत असल्याने एका वाहनधारकाला सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा दंड बजावण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानुसार वाळू घाटांना बंदी असताना नंदुरबारमधून चोरट्या मार्गाने शहरात वाळू आणली जात आहे.