Thu, Jul 02, 2020 22:24होमपेज › Nashik › मुंबई - आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात, ४ जण ठार, ३ जखमी

मुंबई - आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात, ४ जण ठार, ३ जखमी

Published On: Jun 12 2019 5:42PM | Last Updated: Jun 12 2019 5:42PM
धुळे : प्रतिनिधी

मुंबई आग्रा महामार्गावर लळींग गावाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमधील एका पुरुषाची अदयाप ओळख पटलेली नाही. यासंदर्भात मोहाडी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - आग्रा महामार्गावर धुळे शहरानजीकच्या लळीग घाटात आज दुपारी हा भयंकर अपघात झाला आहे. धुळे शहर आणि परीसरात दुधाचे वाटप करुन एमएच 17 बीडी 5269 क्रमांकाची गोदावरी दुधाची गाडी मालेगाव शहराच्या दिशेने जात होती. या गाडीच्या पाठोपाठ प्रवासी वाहतूक करणारी एमएच 18 बीए 2192 क्रमांकाची रिक्षा जात होती. यावेळी मालेगावकडुन  धुळयाकडे एमएच 18 बीए 2192 क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत होता. हा ट्रक लळीग कुरणाकडे जाणा-या प्रवेशव्दाराजवळ येताच अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटुन हा ट्रक दुभाजक ओलांडून चुकीच्या दिशेने आला. हा ट्रक गोदावरी दूध वाहतुक करणा-या गाडीवर आदळल्याने गाडीचा पत्रा कापला गेला. ही जोराची धडक झाल्याने दूधाच्या गाडीत बसलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमीचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

या अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील हे पोलिस पथकासह पोहोचले. या पथकाने तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सहायक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने गाडीतील मृतांच्या वस्तुंजवळ सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ओळख पटवण्याचे काम सुरु केले. यात मयतांमधे अलिया जाकीर अली (वय 7 ), नोशादबी हमीद अली (वय 40),हमीद अली साहेब अली (वय 45), व एका 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा समावेश आहे.

ओळख पटवलेले तीघे मुळ मालेगाव शहरातील रहीवासी असुन ते सध्या सुरत येथे रहात होते. धुळे शहरात नातेवाईकांना भेटण्यासाठी ते आल्याची माहीती पोलिस पथकाने दिली आहे. या अपघातात ट्रक चालक शौकतखान करीमखान पठाण , विक्की नंदलाल ठाकरे, अतुल चैत्राम पाटील हे जखमी झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान ट्रक चालक शौकत खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.